अकोला : जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडला. जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टी झाली. शहरात ४२ घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात शेत जमिनीवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके पाण्यात गेली आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडल्याचे चित्र आहे. ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामाना विभागाने अंदाज वर्तवला असून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अकोला जिल्ह्याला ढगफुटी सदृश पावसाने गुरुवारी सायंकाळी अक्षरश: झोडपून काढले. सुमारे एक तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. सोबतच वादळी वारा देखील सुटला होता. या पावसामुळे अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले. नागरिकांच्या घरात पाणी शिरले. उमरी, गुडधी आदी भागात रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. वस्त्यांमध्ये देखील प्रचंड पाणी साचले होते. प्रचंड पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी २९.२ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक ५१.७ मि.मी. पाऊस मूर्तिजापूर तालुक्यात झाला.
अकोला तालुक्यात ४०.८ मि. मी., अकोट २२ मि.मी., तेल्हारा ३३.७ मि.मी., बाळापूर १६.२, बार्शिटाकळी १९.२ मि. मी. व पातूर १.४ मि. मी. पाऊस पडला आहे. अकोला तालुक्यातील अकोला व पळसो मंडळात, तर मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू आणि लाखापुरी मंडळात अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसामुळे अकोला शहरातील ४२ घरांची पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जिल्ह्यात शुकवारी देखील ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास अनेक भागात चांगला पाऊस झाला. दरम्यान, पावसामुळे नुकसान झालेल्या भागाला आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे विजेचे खांब कोसळले
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महावितरण यंत्रणेला मोठा फटका बसला. या मुसळधार पावसात १३२ के.व्ही. गोरक्षण उपकेंद्र येथून निघणाऱ्या ११ के.व्ही. चित्रा फीडरवरील विद्युत खांब कोसळला. काही ठिकाणी वृक्ष पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. कारागृहाजवळ वृक्ष व खांब रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनात तत्काळ सहाय्यक अभियंता निखिल गवळी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन यंत्रणा सुरळीत केली. इतर भागातही महावितरणचे वीज खांब पडले. त्यामुळे वीज पुरवठा बंद होता.