अमरावती : अप्‍पर वर्धा धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात सध्‍या मुसळधार पाऊस सुरू असल्‍याने धरणातील पाण्‍याची पातळी वाढली असून सकाळपासून ८०३ घनमीटर प्रतिसेकंद इतका येवा धरणात येत असल्‍याने धरणाचे दरवाजे दुपारी ३ वाजता उघडण्‍यात येणार आहे, त्‍यामुळे वर्धा नदीकाठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

अप्‍पर वर्धा धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात ९३ मिमी पाऊस झाला आहे. धरणातील पाण्‍याची पातळी वाढली आहे. दुपारी ३ वाजेपासून धरणातून ३०० घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सोडण्‍यात येणार आहे. प्रकल्‍पात येणाऱ्या पाण्‍याची आवक पाहून विसर्ग वाढविण्‍याचा किंवा कमी करण्‍याचा पुढील निर्णय घेण्‍यात येणार आहे, असे प्रशासनाकडून कळविण्‍यात आले आहे.

हेही वाचा >>>कारधा पुलावर लागले कायमस्वरूपी बॅरिकेटस्; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अप्‍पर वर्धा धरणात सकाळी ७ वाजेपर्यंत ३७०.२६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ६५.६४ टक्‍के जलसाठा झाला होता. आता धरणातून पाणी सोडण्‍यात येणार असल्‍याने वर्धा नदीच्‍या पाण्‍याच्‍या पातळीतही वाढ होणार असल्‍याने नदीकाठच्‍या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.