नागपूर : विदर्भात मंगळवारपासून सुरू झालेला हवामानातील बदल अजूनही कायम आहे. जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मूसळधार पावसाने हजेरी लावली.

मंगळवारी मध्यरात्री उपराजधानीत वादळी वाऱ्यासह मूसळधार पावसाने थैमान घातले. तर बुधवारी सायंकाळी देखील वादळी वाऱ्यासह मूसळधार पाऊस कायम होता. गुरुवारी पहाटेपासून पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भातील वर्धा, भंडारा आदी जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह मूसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यात भंडारा जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झालेला आहे.

राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच नागपूरच्या अनेक भागात सकाळपासूनच मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. वर्धा, भंडारा जिल्ह्यांमध्येही वादळीवाऱ्यासह पावसाने थैमान घातले आहे. वादळी वारा आणि विजांचा कडकडाटासह सर्वत्र पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, सकाळपासूनच पाऊस सुरू झाल्याने शाळकरी विद्यार्थी आणि कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेनकोटचा आधार घेऊनच बाहेर पडावे लागले. दरम्यान, प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळासह गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आतापर्यंत नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला होता. काही शहरांमध्ये तापमानाचरा पारा ४२ अंश सेल्सिअसवर, काही शहरांमध्ये तो ४१ अंश सेल्सिअसवर तर काही शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसवर होता. मात्र, मंगळवारपासून हवामानात झालेल्या बदलामुळे पाऱ्यात पाच ते सहा अंश सेल्सिअसने घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत उपराजधानीसह संपूर्ण विदर्भातच हवामान पूर्णपणे बदलले आहे. आकाश ढगांनी व्यापलेले असतानाच बुधवारी संध्याकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्धा जिल्ह्यातही मूसळधार पाऊस झाला तर अमरावती येथेही पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यात देखील बुधवारी मूसळधार पाऊस झाला. तर आज गुरुवारी देखील या जिल्ह्यात मूसळधार पावसाने हजेरी लावली आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, पण दुसरीकडे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या भागात चक्राकार वाऱ्याचा एक पट्टा आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य महाराष्ट्रापासून कोमोरिन क्षेत्रातून कमी पातळीपर्यंत चक्राकार अभिसरणाच्या स्वरूपात वाऱ्यांचा उत्तर-दक्षिण प्रवाह सुरू आहे. यामुळे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे खालच्या पातळीवर एकमेकांवर आदळत आहेत. या हवामान गतिविधींमुळे, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.