यवतमाळ – मोसमी पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असताना गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरड्या वातावरणासह उन्हाचा पाराही वाढला आहे. आज बुधवारी तापमान ४० अंशावर गेले असताना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास यवतमाळ शहरासह काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर उमरखेड तालुक्यात अनेक भागात घरांवरील टिनपत्रे उडून, केळीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले.

सायंकाळी अचानक आकाशात ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी जिल्ह्यात अनेक भागात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यानंतर पारा बराच खाली आला. गेल्या पाच, सहा दिवसांपासून तापमान ४० अंशावर स्थिरावले असताना आज कोसळलेल्या पावसाने वातावरणात काही काळ गारवा निर्माण केला. पाऊस पडून गेल्यानंतर मात्र आकाश पुन्हा निरभ्र झाले.

वादळामुळे घरावरील टिनपत्रे उडाली

दरम्यान उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे व परिसरात सायंकाळी वादळासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली असून अनेक घरांची नासधुस झाली. परिसरातील केळी पिकासह शेतातील अन्य पिकांचेही नुकसान झाले आहे. केळी बागांना मात्र जबर फटका बसला आहे. वादळामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. महसूल व कृषी विभागाने या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.