भंडारा : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. गुरुवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे लाखनी येथील समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात आणि वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे शाळेत तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पाण्यातून बाहेर निघताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली. पाणी साचल्यामुळे शाळेतील साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले असून पोषण आहाराची पोती देखील पाण्यात भिजली. त्यामुळे अन्नधान्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.
लाखनी तालुक्यातील समर्थ प्राथमिक विद्यालयात पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. गुरुवारी नित्याप्रमाणे दुपार पाळीच्या शाळेला विद्यार्थी हजर झाले. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असताना दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थी वर्ग खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे घेत होते. मात्र अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने शाळेच्या पटांगणात पाणी साचायला सुरुवात झाली. काहीच वेळात शाळेच्या प्रांगणासह वर्ग खोल्यांमध्ये सुमारे दोन ते तीन फूट पाणी साचले. हे पाणी शाळेच्या समोरील मैदानावर साचून शाळेच्या इमारतीत घुसले. वर्गखोल्यांमध्येही शिरले आणि संपूर्ण शाळा परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.
पावसाचे पाणी शाळेचे कार्यालय, शिक्षक कक्ष आणि वर्ग खोल्यांमध्ये शिरल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. चिमुकले विद्यार्थी एका हातात जोडे तर दुसऱ्या हातात शाळेचे दप्तर घेऊन तारेवरची कसरत करत पाण्यातून बाहेर निघण्यासाठी धडपड करताना दिसू लागले. पावसाच्या पाण्यामुळे शाळेतील पोषण आहाराची पोती देखील भिजली आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची तारांबळ उडाली.
वर्ग खोल्यांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचे दप्तर असल्याने पुस्तके आणि दप्तर भिजण्याची ही भीती त्यांना वाटू लागली. काही विद्यार्थी तर भीतीपोटी डेक्सवर चढून आरडाओरडा करू लागले. या पाण्यात विषारी जीव जंतूंचा वावर असण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला किंवा आरोग्याला कोणतेही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी शिक्षक आणि मुख्यध्यापकांनाही काळजी वाटू लागली. शाळेच्या पटांगणात ठेवलेल्या विद्यार्थ्यांच्या सायकलही पाण्यात बुडाल्याने त्यांना घरी कसे जायचे असा प्रश्न पडला. या प्रकारामुळे विद्यार्थी गोंधळलेले आणि भयभीत झालेले दिसून आले.या संपूर्ण प्रकारामुळे पालकांना देखील मनस्ताप झाला असून शाळेच्या दुरावस्थेबाबत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
समर्थ प्राथमिक विद्यालयात परिसरातील पाणी निघून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे हा प्रकार दरवेळी पावसाळ्यात घडत असतो. या बाबत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना वेळोवेळी लेखी आणि मौखिक सुचना देवूनही पाणी काढण्याबाबत व पाणी साचू नये यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसाईचा सामना करावा लागत आहे. या प्रकारानंतर शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी लेखी निवेदनाद्वारे पाणी निघून जाण्यासाठी नालीचे बांधकाम करून योग्य ती व्यवस्था न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.