यवतमाळ – जिल्ह्यात शुक्रवारपासून कोसळलेल्या पावसाने पाच तालुक्यांत प्रचंड थैमान घातले. उमरखेड, महागाव, पुसद, आर्णी या तालुक्यात पावसामुळे हाहाकार उडाला. पैनगंगा नदीला आलेल्या पुराने विदर्भ, मराठवाडा सिमेवरील अनेक गावांमध्ये नुकसान केले. जिल्ह्यात २८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, २४ तासांत ४३.२० मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तब्बल ८१ हजार १२४ हेक्टरवरील पिके खरडून गेली तर तीन हजार ३६५ घरांची पडझड झाली. उमरखेड आणि पुसद तालुक्यात या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला. बुधवारी केवळ नऊ तासांत ७२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाने वादळासह जोर पकडला. शनिवारी उमरखेड आणि पुसद तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला. महागाव आणि बाभूळगाव तालुक्यात दोघे जण पुरात वाहून गेले, तर घाटंजी तालुक्यात वीज कोसळल्याने एका शेतमजुराचा मृत्यू झाला. वीज कोसळल्याने दोन गायी, एक बैल, एक म्हैस ठार झाले, तर १४ जनावरे विविध ठिकाणी पुरात वाहून गेले. उमरखेड तालुक्यात तीन हजार ४९ घरांचे तर पुसद तालुक्यात २५९ घरांची पडझड झाली. उमरखेड तालुक्यात २०० च्या वर घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते.
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी सायंकाळपासून रविवारपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. घाटंजी तालुक्यात वीज पडून इसमाचा मृत्यू झाला. महागाव, बाभूळगाव तालुक्यात दोघेजण पुरात वाहून गेले. उमरखेड तालुक्यात सर्वदूर नदी, नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले. मारेगाव तालुक्यात एक बैल आणि पुसद तालुक्यात दोन गायी वीज कोसळून दगावल्या. शनिवारी पुरामुळे अनेक मार्ग बंद होते. रविवारी पावसाने काही भागात उसंत घेतली, मात्र मराठवाड्यात कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला. या पुरामुळे महागाव, आर्णी, उमरखेड आदी तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी जिल्ह्यात सर्वस्तरावरून होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ४६ व्या स्मृतीदिनानिमित्त आज सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुसद येथे आयोजित कार्यक्रमासाठी येत आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत सर्वत्र अतिवृष्टीने ८१ हजार हेक्टरवरील पीक रखडून गेले. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या मागण्यांवर निर्णय घेण्याचे आवाहन शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केले आहे. हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जन्मभूमीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून दिलासा देतील, असे मनीष जाधव यांनी म्हटले आहे.