अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीप्रकरणी उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्याने बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालामुळे बदली इच्छूक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही ग्रामविकास विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रियादेखील ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते. २४ एप्रिलपूर्वी सर्व शिक्षकांना आपली माहिती ऑनलाइन भरण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार १०० टक्के शिक्षकांनी माहिती भरली. त्यामुळे जिल्ह्यात किती जागा मंजूर आहेत व किती शिक्षक कार्यरत आहेत, यासंबंधीचे चित्र स्पष्ट झाले होते. यानंतर पोर्टलवर रिक्त जागांची माहिती भरण्याचे काम सुरू झाले होते.

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा ज्या शिक्षकांनी लाभ घेतला आहे, अशा दोन शिक्षकांना त्या-त्या जिल्ह्यात सेवा ज्येष्ठतेचा लाभ घेताना जो शिक्षक सेवेने कनिष्ठ आहे, त्याचीच सेवा ज्येष्ठता त्यांना जिल्हांतर्गत बदलीमध्ये देण्यात येईल, असा शासन निर्णय आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या अशाच काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. कनिष्ठ शिक्षकांप्रमाणे सेवा ज्येष्ठता बदलीसाठी ग्राह्य धरावी, असे त्यांचे म्हणणे आहे.या अनुषंगाने जिल्हा सेवा ज्येष्ठतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला ५ मे पर्यंत स्थगित दिली होती. ५ मे रोजी न्यायालयात यावर सुनावणी होऊन ९ मे रोजी न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. या निर्णयानुसार आंतरजिल्हा बदल्यांमध्ये आपसात बदली झालेल्या शिक्षकांपैकी सेवा कनिष्ठ शिक्षकांची सेवा दोन्ही शिक्षकांना बदलीसाठी ग्राह्य धरावी, असा निकाल दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाच्या निकालामुळे जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेवरील स्थगिती उठलेली आहे. आता ग्रामविकास विभागाने तातडीने जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करावी. ही बदलीची प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मात्र वेळेत पूर्ण होणेही तितकेच गरजेचे आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे शिक्षकांची ही बदली प्रक्रिया आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणे गरजेचे आहे. याकडे प्रशासकीय पातळीवरून विलंब झाला आणि निवडणुकांची आचारसंहिता लागली तर बदली प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी म्हटले आहे.