भंडारा : राज्यात सर्वत्र ‘हिट अँड रन’ च्या घटना सातत्याने घडत असतानाच भंडाऱ्यातही बुधवारी रात्रीच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.
भंडाऱ्यात एका पिकअप वाहन चालकाने रस्त्यावरून चालणाऱ्या तीन जणांना धडक दिली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.अत्यंत गजबजलेल्या जे. एम पटेल कॉलेज मार्गावर ही घटना घडली आहे. एका भरधाव पिकअप वाहनांने तिघांना जबर धडक दिली आहे. यामध्ये तिघांनाही दुखापत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या तिघांमध्ये पोलीस कर्मचारी विजय तायडे यांची आई नंदा तायडे यांचा समावेश आहे.
सुरुवातीला दोघांना धडक दिल्यानंतर कारवाईच्या धास्तीनं वाहनासह चालक तिथून पळाला. यानंतर त्याचे पिकअप वाहनानं जे एम पटेल कॉलेजच्या मागील भागात असलेल्या शासकीय मुलींच्या वसतीगृहाजवळ पोलीस कर्मचाऱ्यांच्या आईला जबर धडक दिली. या अपघातानंतर चालकानं वाहन अंधारात सोडून तिथून पळाला आहे. या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश असून ते सुदैवानं बचावलेत. भंडारा पोलीस पुढील तपास करीत आहे.