नागपूर: हनी ट्रॅप प्रकरणात विरोधकांकडे काही ठोस माहिती असती, तर ती त्यांनी माध्यमांसमोर किंवा थेट विधानसभेत मांडली असती. पण त्यांच्या हाती काहीच नाही. ते केवळ संभ्रमित करीत आहेत, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे केली.
संजय राऊत यांना जे सांगितलं जातंय, ते विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोले यांच्या बाजूनेच दिसतंय. जनतेला संभ्रमित करून स्वतःची टीआरपी वाढवण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सभागृहात स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. तुमच्याकडे काही पुरावे असतील, तर ते समोर आणावेत. ज्यांच्याकडे खरोखर काही असतं, ते एका सेकंदात जनतेसमोर आणतात. हे लोक तसं काही करीत नाहीत, कारण त्यांच्या हातात काही नाही.” असे बावनकुळे म्हणाले.
छावा पदाधिकाऱ्यांवर हल्ला
राज्यात कोणीही रस्त्यावरची लढाई लढू नये, मग ते अजितदादांचे कार्यकर्ते असोत वा छावा संघटनेचे. ही लढाई वैचारिक असली पाहिजे, रस्त्यावरील नव्हे. ‘मार्केटिंग’ करून कायदा-सुव्यवस्था बिघडवणं, एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून निर्णय होणार नाहीत. विकसित महाराष्ट्रासाठी अशा तंट्यांना स्थान नाही. आपसातील राड्यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये. आंदोलनाचे स्वरूप मारहाणीचे नसून वैचारिक असले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
गिरीश महाजन यांच्याबाबत खडसेंनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ गुन्हा केला असं होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केलं, असा होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही.