बेपत्ता ‘जय’चा शोध

उमरेड-करांडला अभयारण्यातील ‘जय’ या वाघाच्या बेपत्ता होण्यासंदर्भात गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू याच्या चौकशीचे आदेश मंत्रालयातून निघाले असून याप्रकरणी २३ सप्टेंबपर्यंत सविस्तर अहवाल सादर करावा, असे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)भगवान यांना देण्यात आले आहे.

मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू यांनी गेल्या तीन वर्षांत गावकरी व वनखात्यात समन्वय साधण्याचे कार्य केले नाही. ‘जय’ हा वाघ गेल्या ५-६ महिन्यांपासून बेपत्ता आहे, पण त्यासंदर्भातही कारू यांनी कोणतेच पाऊल उचलले नाही. त्याच्या कार्यकाळात वाघाचे बेपत्ता होणे, अवैध वृक्षतोड, अभयारण्यात अवैध कामे आदी बाबी समोर आल्या आहेत. निष्क्रिय, बेजबाबदार मानद वन्यजीव रक्षकाची ताबडतोब हकालपट्टी करावी अशी मागणी अमोल कोल्हे व गावकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर पारवे व अधिकाऱ्यांना केली होती. याची दखल घेत पालकमंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही बाब सोपविली. त्या अनुषंगाने महसूल व वनखात्याचे विशेष कार्य अधिकारी अरविंद आपटे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) भगवान यांना पत्र लिहिले आहे. यापूर्वीही कारू याच्याबाबत तक्रार केली होती. मात्र, कारू यांनी लोकसत्ताशी बोलताना हे सर्व आरोप खोडून काढले होते.