अकोला : कुऱ्हाडीने वार करून पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी गावात सोमवारी घडली. या थरारक घटनेने वाशीम जिल्हा संपूर्णत: हादरला असून मोठी खळबळ उडाली आहे. मानसिक त्रास व व्यसनाधिनतेतून पती व पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून रागाच्या भरात हे कृत्य घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मानसिक अस्वस्था, व्यसनाधिनता व त्यातून निर्माण झालेला राग यातून अस्थिरता येते. जीवनात अनर्थ घडवू शकतो. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे ठरते. दाम्पत्य आपसात असे प्रकार आल्यास संसाराची देखील राखरांगोळी होते. वाशीम जिह्यात सोमवारी याच प्रकारे एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृणा हत्या केली. त्यानंतर स्वतः राहत्या घरी गळफास घेत आपली जीवन यात्रा सुद्धा संपवल्याने खळबळ उडाली.
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोठारी गावातून ही घटना घडली आहे. हिम्मत महादेव धोंगडे (वय ४१) हे व्यसनाधीन होते. त्यांना मानसिक आजाराचा त्रास सुद्धा होता. त्यांच्या पत्नी कल्पना धोंगडे (वय ३७) ही पतीला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा आग्रह धरत होती. या कारणावरून दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा किरकोळ वाद अत्यंत टाेकाला गेला. त्यातून संतापलेल्या पतीने घरातील धारदार वीळा-कुऱ्हाडीने पत्नीवर जोरदार वार केले. या हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. त्यात कल्पना धोंगडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. पत्नीच्या हत्येचा पतीला मोठा धक्का बसला. पती हिम्मत धोंगडे यांनी स्वतःला राहत्या घरात कोंडून घेतले. पत्नीची हत्या केल्याच्या धक्क्यातून पतीने देखील गळफास घेत राहत्या घरामध्ये आत्महत्या केली.
या धक्कादायक घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मंगरूळपीर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात पतीची मानसिक अस्वस्था आणि व्यसनाधीनतेतून हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे. कोठारी गावात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे. मंगरूळपीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.