नागपूरमधील धक्कादायक प्रकार; पैशांसाठी अडवणूक

दोनच दिवसांपूर्वी गडचिरोलीतील भामरागड जंगलात नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात जखमी झालेल्या २० जवानांवर उपचार करण्यास येथील काही नामांकित रुग्णालयांनी नकार दिल्याची माहिती पुढे आली आहे. काही रुग्णालयांमधील डॉक्टरांनी तर पोलीस अधिकाऱ्यांचे दूरध्वनीही घेतले नाही. पैशासाठी रुग्णालयांनी जवानांचे जीव धोक्यात घालून सरकारची अडवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सुकमा (छत्तीसगड) जिल्ह्य़ात नक्षलवाद्याच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २६ जवान शहीद झाले होते. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांसोबत पोलिसांची चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. त्यात १९ जवान जखमी झाले होते. त्यांना नागपुरात उपचारासाठी हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी प्रथम वर्धा मार्गावरील एक व धंतोली परिसरातील दोन प्रसिद्ध रुग्णालयाशी पोलिसांच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संपर्क साधला, परंतु एकाने थकीत बिलाच्या रकमेचा दाखला देऊन अग्रीम रकमेची मागणी केली, तर दोन रुग्णालयांनी आपल्याकडे डॉक्टर नाही, खाटा उपलब्ध नाही, अशी कारणे पुढे करून उपचारास नकार दिला. त्यानंतर जखमी जवानांना दिघोरी परिसरातील ‘क्युअर इट’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण १८ जवानांपैकी एकाची प्रकृती आताही चिंताजनक आहे. तर सात जवानांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतरांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती रुग्णालयाचे डॉक्टर रोशन भिवापूरकर यांनी दिली. मात्र, जवानांच्या उपचारास नकार देणाऱ्या त्या नामांकित रुग्णालयाविरुद्ध पोलीस दलात प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

रुग्णालयांची चौकशी करणार

एखाद्या वेळेस थकीत देणी असू शकतात. मात्र, तीन महिन्यांपेक्षा अधिक देणी (बील) थकीत नाहीत. त्यामुळे रुग्णालयांनी जवानांच्या उपचारास नकार देणे चुकीचे आहे. जवानांच्या उपचाराकरिता राज्य सरकार दरवर्षी ७० कोटी रुपयांची तरतूद करीत असून तेवढा निधी खर्च होत नाही. त्यामुळे केवळ पैशासाठी जवानांच्या उपचारास नकार देणाऱ्या रुग्णालयांची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पर्यायी त्यांना पोलिसांच्या उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांच्या यादीतून वगळण्यात येईल. – डॉ. रणजित पाटील, गृहराज्यमंत्री

नक्षलग्रस्त भागातील सुरक्षेचा आढावा

देशभरातील नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांतील पोलीस, केंद्रीय सुरक्षा बल व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. छत्तीसगड व गडचिरोली येथील नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याची स्वत: पाहणी केली असून त्यासंदर्भात ८ मे रोजी दिल्लीत गृह विभागाची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत नक्षलवाद्यांचा सामना करणे आणि त्या जिल्ह्य़ांमध्ये विकास कामांना गती देण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येईल. – हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्यमंत्री

काय झाले?

जखमी जवानांवर उपचारांसाठी वर्धा मार्गावरील एक व धंतोली परिसरातील दोन प्रसिद्ध रुग्णालयाशी पोलिसांनी संपर्क साधला.  एकाने थकीत बिलाच्या रकमेचा दाखला देऊन अग्रीम रकमेची मागणी केली, तर दोन रुग्णालयांनी आपल्याकडे डॉक्टर, खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत उपचारास असमर्थता व्यक्त केली.