नागपूर : कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्णालयाचे बांधकाम केले जाते, मात्र वाहनतळाची जागा फक्त नावापुरतीच सोडली जाते. शहरातील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये असा प्रकार घडला आहे. त्यामुळे रुग्णालयात आलेली वाहने रस्त्यावर उभी राहत असून सर्वसामान्य नागपूरकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पोलीस आयुक्तांनी या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन रुग्णालयांवर धडक कारवाईसाठी अभियान राबवण्याची मागणी नागरिकांडून होत आहे.

धंतोली, सीताबर्डी, नंदनवन, कोतवाली, तहसील, गणेशपेठ आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक रुग्णालये आहेत. नगररचना विभागाच्या मंजूर नकाशाप्रमाणे जवळपास सर्वच रुग्णालयांचा तळमजला वाहनताळासाठी आरक्षित असल्याचे दर्शवण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात वाहनताळाच्या जागेवर ओपीडी, रिसेप्शन, प्रतीक्षा कक्ष, औषध दुकान, लिफ्ट, उपाहारगृह आदी सुविधा असतात. ही बाब कायदेशीरदृष्ट्या गंभीर असतानाही महापालिका आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करते. महापालिका प्रशासन तर केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडण्यातच धन्यता मानत असल्याचेही समोर आले आहे. रुग्णालयाकडून वाहनतळासाठीच्या जागेचा गैरवापर होत असल्याने शहरात वाहतुकीच्या समस्येत भर पडली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियम मोडणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा – बुलढाणा : “न्यायदेवतेचा निर्णय दिशादर्शक अन् स्वागतार्ह”; आमदार रायमूलकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “सभापतींचे संवैधानिक महत्त्व…”

उच्च न्यायालयाच्या आदेशालाही ‘खो’

वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त आणि महापालिका आयुक्तांनी संयुक्तपणे उपाय योजावेत. शिवाय जनआक्रोश या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा. याशिवाय रुग्णालयांचा इमारत आराखडा मंजूर करताना दाखवण्यात आलेल्या वाहनतळाच्या जागेचा गैरवापर सुरू असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि बांधकाम पाडावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशालाही रुग्णालयांनी ‘खो’ दिला आहे.

हेही वाचा – वर्धा : चढ्या सेंद्रिय धान्य बाजारात फसवणुकीचा नवा फंडा; भामट्यांनी सेंद्रिय सांगत विकली चक्क…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांचे रुग्णालयांशी साटेलोटे

रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रस्त्यावर आणि पदपथावर वाहन ठेवतात. त्याकडे वाहतूक पोलिसांचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलिसांचे रुग्णालय प्रशासनाशी साटेलोटे असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.