नागपूर: प्रेम ही माणसाची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्यातून आनंद व उत्साहाची अनुभूती येते. परंतु, प्रेमभंगामुळे मन दुखावते. शालेय वयातील (पौगंडावस्थेत) प्रेम आकर्षणातून होत असते. या मुलांच्या प्रेमभंगामुळे काही वेळा तीव्र स्वरूपाच्या भावनिक व हिंसक प्रतिक्रियाही उमटतात. त्यावर मैत्रीपूर्ण व्यवहाराने तोडगा काढणे शक्य आहे, असे मत मेडिकल रुग्णालयातील ड्रग ट्रिटमेंट क्लिनिकचे प्रमुख आणि नागपूर सायक्रेटिस सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. मनीष ठाकरे यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.
डॉ. ठाकरे म्हणाले, शाळकरी वयात मुलांचा भावनिक विकास पूर्ण झालेला नसतो. या काळात आकर्षणातून प्रेमसंबंध निर्माण होतात. पुढे प्रेमभंग झाल्यास तो धक्का पचवणे जड जाते. स्वत:वरील भावनिक नियंत्रणाची प्रक्रिया पूर्ण विकसित न झाल्यामुळे अनपेक्षित प्रतिक्रिया उमटते. संताप व कधीकधी सूड घेण्याची भावना देखील तयार होते. त्यातूनच अशी मुले वा मुली हिंसक कृत्यांमध्ये ओढली जातात. नकार किंवा प्रेमभंग ही एक शक्यता म्हणून त्याकडे पाहिले जात नाही. याउलट आत्मसन्मानाला ठेच समजली जाते. त्यातून संताप वाढतो व अनपेक्षित प्रतिक्रिया घडू शकते, याकडे डॉ. ठाकरे यांनी लक्ष वेधले.
कौटुंबिक घडामोडींचा मुलांच्या मनावर परिणाम
जी मुले घरी व शेजारी लहानपणापासून भांडण, मारहाण बघत असतात ते अशा प्रकारच्या वागण्याला सामान्य समजतात. त्यामुळे प्रेमभंगानंतर असे कृत्य करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही. लहानपणापासून प्रत्येक हौस आणि मौज आई-वडिलांनी पूर्ण केली असल्याने या मुलांना नकार पचवता येत नाही. त्यातही प्रेमाचा नकार पचवणे तर फारच जड जाते. परंतु लहानपणापासून कौटुंबिक वातावरण मैत्रीपूर्ण असेल, झालेली चूक घरी सांगितल्यावर भीती वाटण्यासारखे काही घडणार नसेल तर हिंसक कृती टाळली जाऊ शकते, असेही डॉ. ठाकरे यांनी सांगितले.
पालकांनी काय करावे?
कुटुंबात मोकळेपणा असणे मुलांच्या सकारात्मक स्वभावासाठी गरजेचे आहे. अशा वातावरणामुळे समस्यांवर व भावनिक परिस्थितीवर घरी चर्चा होऊ शकते, त्याद्वारे तोडगा निघू शकतो. नेमके काय घडले, हे घरी समजून घेतले जाणार असेल तर प्रेमभंगानंतरही नैराश्य वा हिंसा टळू शकते. त्यासाठी प्रेमभंगानंतर त्या व्यक्तीशी तातडीने संबंध संपवणे, वेदना कमी करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांसह समुपदेशकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले.
प्रेमभंगानंतर काय करावे?
– घरी व आपल्या जवळच्या मित्रांना प्रेमभंगाबाबतची माहिती द्यावी.
– दिनचर्या बदलावी, जेणेकरून इतरांना तुमच्या दैनंदिन घडामोडींचा अंदाज येणार नाही
– कुटुंबीय, मित्रांना आपल्या जाण्या-येण्याच्या ठिकाणाविषयी वेळोवेळी माहिती द्यावी
– वादानंतर कुणी पाठलाग करीत असेल, दबाव टाकत असेल तर घरच्यांना व गरज भासल्यास पोलिसांना कळवायला हवे.