सोलापूर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने बिनतोड उत्तर देऊन पाकिस्तानचा नापाक इरादा उधळून लावला. त्यातून युद्धाचे सावट समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर इकडे सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी घटली होती. परंतु आता युद्धाचे सावट दूर झाल्यानंतर अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी पुन्हा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवडाभर भारत-पाक तणाव वाढून भारतीय लष्कराने पाकपुरस्कृत नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करीत जोरदार हल्ले केले. यातून पाकिस्तानची अक्षरशः दाणादाण उडाली. युद्धाचे हे सावट देशभरात पसरले असताना त्याचा परिणाम देशातील पर्यटन व्यवसायावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोटसह आसपासच्या भागातील तुळजापूर, गाणगापूर, विजापूर, हंपी, बदामी आदी धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळांमधील पर्यटक तथा भाविकांची गर्दी रोडावली होती. विशेषतः अक्कलकोटमध्ये गेल्या शनिवारी आणि रविवारी लागोपाठ दोन सुट्यांमुळे भाविकांची मोठी मांदियाळी जमण्याची अपेक्षा होती. परंतु नेहमीच्या तुलनेत भाविकांची संख्या २५ टक्केही नव्हती.

तथापि, युद्धविराम होऊन पर्यायाने युद्धाचे सावट दूर झाल्यानंतर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारी भाविकांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्रीपासून भाविकांच्या गर्दीने अक्कलकोट नगरी गजबजू लागली. दिवसरात्र खासगी चारचाकी मोटारींसह एसटी बस व खासगी आराम बसमधून येणाऱ्या भाविकांनी श्री स्वामी समर्थ मंदिर व शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात दाटीवाटी वाढली आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी आणि मुक्कामासाठी भाविकांची गर्दी वाढल्याचे अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी सांगितले.

युद्धाचे सावट होते म्हणून…

गेले आठवडावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले केल्यानंतर निर्माण झालेले युद्धाचे सावट पाहता अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या रोडावली होती. शनिवार आणि रविवार दोन दिवस सुटी आणि उन्हाळ्यामुळे शालेय सुटी यामुळे भाविकांची वर्दळ वाढण्याची अपेक्षा होती. परंतु युद्धाचे सावट पसरल्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली. परंतु आज युद्धाचे सावट दूर झाल्यानंतर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी स्वामींच्या दरबारात वाढली आहे. – महेश इंगळे,

अध्यक्ष, वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट