“घेऊन जा रे मारबत…इडा पिडा घेऊन जा रे बडग्या…” अशा घोषणा देत १४१ वर्षांची परंपरा असलेली काळी, पिवळी मारबत व बडग्यांची मिरवणूक नागपुरमध्ये उत्साहात निघाली.

करोनाचे निर्बंध शिथील केल्यामुळे दोन वर्षानंतर निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी नागपुरकरांनी मोठी गर्दी केली होती. सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करणाऱ्या काळ्या आणि पिवळ्या मारबतसह विविध बडगे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. नेहरू पुतळा चौकात काळी व पिवळी मारबत एकत्र आल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात आणि ‘घेऊन जा रे मारबत’ अशा घोषणा देत जल्लोष करण्यात आला.

PHOTOS : “घेऊन जा रे मारबत…इडा पिडा घेऊन जा रे बडग्या…”; अन् नागपुरकरांची तुफान गर्दी

छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीतर्फ ‘भोंगे झाले बंद, फोकनाडे जेलमध्ये बंद’, ‘लवासा ओक्के’ बारामती ओक्के’, ‘भोंगे झाले बंद’… असे भाष्य करणारा भ्रष्टाचारी बडग्या, तर खैरीपुरा बडग्या उत्सव समितीने केलेल्या ‘काय ती स्मार्ट सिटी, काय ते खड्डे, काय ते रस्ते, काय ते प्रशासन, एकदम ओक्के…’ अशी महापालिकेवर टीका करणारा बडग्या आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरावर भाष्य करणारा बाल बडग्या अशा उत्सव मंडळाचा बडग्यांनी लोकांचे लक्ष वेधले होते.