नागपूर : व्याघ्र अभयारण्यास भोवताल असलेली मानवी उपस्थिती आणि मानवी सहवासामुळे वाघांच्या पचनसंस्थेतील अब्जावधी जीवाणूंच्या रचनेत बदल होत आहे. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने (सीसीएमबी) केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

सीसीएमबीच्या अभ्यासकांनी दोन वर्षांच्या कालावधीत उत्तराखंडमधील कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेशातील कान्हा आणि बांधवगड, महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी आणि केरळमधील पेरियार या देशातील पाच प्रमुख अभयारण्यांमधून वाघांच्या विष्ठेचे विश्लेषण केले. यात त्यांना मानवी उपस्थिती आणि मानवी सहवासाचा वाघांवर होणारा परिणाम चिंताजनक असल्याचे आढळले. वाघांसाठी आतड्यातील जीवाणू अतिशय महत्त्वाचे असतात. कारण ते अन्न पचवण्यात, पोषक तत्त्वांचे शोषण करण्यात, रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करण्यात आणि संसर्गाशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे जीवाणू असंतुलित झाल्यास या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. या अभ्यासात असे आढळून आले की टोल्युइन, स्टायरीन, बिस्फेनॉल आणि पॉलिसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बनसह विषारी रसायने नष्ट करण्यात सक्षम असलेले जीवाणू जास्त मानवी हस्तक्षेप असलेल्या भागात अधिक प्रमाणात आढळले.

प्रामुख्याने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात खुल्या कोळसा खाणी आणि औष्णिक वीज प्रकल्प जवळ असल्याने त्याठिकाणी हा प्रकार अधिक आहे. वाघांच्या आतड्यांतील जीवाणू पर्यावरणीय दूषित घटकांशी जुळवून घेत आहेत. मात्र त्याचे दुष्परिणाम मोठे आहेत. ऋतूनुसार जीवाणू समुदायांमध्येही लक्षणीय बदल झालेले दिसून आले. हवामान बदलल्यामुळे शिकार उपलब्धता, आहार रचना आणि ताण पातळीमध्ये बदल झाला. या अभ्यासातून आणखी एक चिंताजनक बाब उघडकीस आली. संशोधकांनी हे जीवाणू समुदाय काय करण्यास सक्षम आहे याचे विश्लेषण केले असता त्यांना मधुमेह, अल्झायमर यांसारख्या संसर्गाचा अंतर्भाव आढळला. मात्र याचा अर्थ वाघ आजारी आहेत असे होत नाही, असेही अभ्यासकांनी स्पष्ट केले. हे अंदाज मानवी वैद्यकीय ज्ञानावर आधारित आहेत आणि त्यांचे काळजीपूर्वक अर्थ लावले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आतड्यांचे आरोग्य महत्त्वाचे’

– जगातील ७० टक्क्यांहून अधिक वाघ भारतात आहेत. संरक्षण व संवर्धनामुळे ही संख्या वाढत आहे. अशावेळी फक्त वाघांची गणना करणे पुरेसे नाही तर त्यांच्या अधिवासाची गुणवत्ता आणि आता तर त्यांच्या आतड्यांचे आरोग्यही सुरक्षित केले पाहिजे.

– मानवी आतड्यांतील सूक्ष्मजीव आणि आरोग्य आणि निरोगीपणामध्ये त्यांची भूमिका याबद्दल विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

– आतड्यांतील सूक्ष्मजीव वाघांच्या आरोग्याचे आणि अधिवासाच्या गुणवत्तेचे प्रमुख सूचक म्हणून काम करतात. त्यामुळे जंगलातील प्राण्यांच्या आतड्यांतील सूक्ष्मजीव समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही संशोधकांनी यात म्हटले आहे.