नागपूर : राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसत  असला तरी विदर्भात मात्र चित्र वेगळे आहे. सध्याच्या दमट वातावरणाचा फटका या भागातील तूर, गहू आणि चणा या पिकांना बसला असून या पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता कृषी संशोधक व्यक्त करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या या भागात तूर, गहू आणि चणा शेतात आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थंडी सुरू होते. ती वरील पिकांसाठी पोषक ठरते, मात्र सध्या दमट वातावरण आहे. अजूनही थंडीने जोर पकडला नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली तसेच अळ्यांचा प्रादुर्भावही वाढल्याचे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधक डॉ. प्रमोद राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही ही बाब मान्य केली.  ते म्हणाले की, तूर, गहू आणि चणा या पिकांना सध्याचे दमट वातावरण पोषक नाही. यामुळे या पिकांची वाढ खुंटते शिवाय बुरशीजन्य रोगही पडू शकतात. यासंदर्भात नागपूर जिल्ह्यातील प्रगतशिल शेतकरी अमिताभ पावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तूर आणि चण्याला सध्याच्या वातावरणाचा फटका बसल्याचे मान्य केले. दक्षिणेत पाऊस पडल्यावर अशी स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता होतीच. संत्र्याचे पीक सध्या निघाले असल्याने त्याला या वातावरणाचा धोका नाही, पण ढगाळ वातावरणामुळे कधीही पाऊस येऊ शकतो व त्याचा फटका संत्री पिकाला बसेल, अशी भीती उत्पादकांमध्ये आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात विभागीय कृषी सहसंचालक आर.जे. भोसले यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Humid climate hits crops vidarbha ysh
First published on: 20-11-2021 at 00:11 IST