अकोला : अकोला वनपरिक्षेत्रातील पातूर-नंदापूर क्षेत्रात वन्यजीव काळविटाची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शिकार केलेल्या काळविटाच्या मांसाची विक्री केल्या जात होती. याची माहिती मिळताच अकोला वन विभागाने एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून शिकारीसाठी वापरलेले साहित्य, काळविटाचे मांस आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.

वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस विक्रीचे प्रकार वाढले आहेत. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने काळविटाच्या शिकार प्रकरणात सापळा रचला. पथकाने कारवाई करून आरोपी फुलसिंग सिताराम जाधव (वय ४५, रा. कानडी घोंगा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) याला रंगेहात पकडण्यात आले. आरोपीकडून सुमारे १० किलो काळविटाचे मांस, दोन सुऱ्या व एक लाकडी ओडका, काळविटाचे मुंडके आणि शिकार करण्यासाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६) ए, बी, सी, २ (३६) ९, ३९, ४४, ४८, (ए) ५०, व ५१ नुसार काळवीट शिकार प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये अकोला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पिंजर पोलीस पोलिसांचेही सहकार्य लाभले. ही कारवाई उपवनसंरक्षक सुमत सोळंके, सहायक वनसंरक्षक (वने) नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वन्यजीवांच्या संरक्षण प्राधान्याने केले जात असून या प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

सव्वा महिन्यांत दुसऱ्यांदा कारवाई

काळवीट शिकार प्रकरणात गेल्या सव्वा महिन्यांत दुसऱ्यांदा वन विभागाने कारवाई केली आहे. काळविटाची शिकार करून त्याचे मांस खाण्याचा बेत आखणाऱ्या आरोपींना अकोला प्रादेशिक वनविभागाने जेवणाच्या ताटावरूनच रंगेहात ताब्यात घेतले होते. अकोट वनपरिक्षेत्रात जऊळखेड येथे ही कारवाई २० जुलैला झाली होती. या प्रकरणी वन विभागाने चार आरोपींवर गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली होती. वन्यप्राणी काळविटची शिकार करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती अकोला (प्रादेशिक) वनविभागाला मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार जऊळखेड येथून आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले होते. काळविटाचे मांस शिजवून खात असतांना आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा काळवीट शिकार प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.