नागपूर : पती- पत्नीचे नाते हे नाजूक असते. त्यावर फारसं जाहिरपणे बोलले जात नाही. आपुलकी आणि विश्वासातून बहरत जाण्यासाठी या नात्यात प्रेम फुलणं किती महत्त्वाचं आहे ते मैत्रीपूर्ण संवादातून कसं टिकवता येईल यावर नागपुरात एक दिवसीय कार्यशाळाच घेण्यात आली. तीत उमटलेला सूर हे नातं कसं टिकवून ठेवावं याचं विश्लेषण करण्यात आलं.
हल्ली शेती संपन्न देशातल्या अर्थव्यवस्थेने नोकरी आणि उद्योगांची कास धरली आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब संस्था पूर्णतः मोडून पडली. काळाच्या ओघात आता विभक्त कुटुंब संस्था देखील संपत आहे. त्या जागी तात्पुरत्या नात्यांमधून एकल व्यवस्था तयार होत आहे. स्त्री- पुरुषांमधले नाते हे कृत्रिम साच्यांमध्ये अक्षरशः कोंबले जात आहे. यातून नात्यांमध्ये इर्षा व अहंकाराच्या विषाची पेरणी होत असल्याने नाते फुलण्याआधीच उद्ध्वस्त होतं, अशी चिंताही यातून उमटली.
स्त्री – पुरुष नातेसंबंध विषय केंद्रस्थानी ठेवून चिटणवीस सेंटर येथे ही दिवसीय कार्यशाळा झाली. रवींद्र रुक्मीणी पंढरीनाथ आणि अनुराधा मोहनी या जोडप्याने अतिशय सोप्या शब्दांमध्ये स्त्री – पुरुष नाते संबंधांमधील वीण उलगडून दाखविली.
परस्पर संवादातून सुरू झालेल्या कार्यशाळेच्या सुरुवातीलाच थेट विषयाला हात घालत रवींद्र रुक्मीणी पंढरीनाथ म्हणाले, विवाह आणि कुटुंब संस्था दोन्ही परस्पर भिन्न बाबी आहे. दोन भिन्न लिंगांच्या व्यक्तींमधला विवाह हा कृत्रिम साचा आहे. निसर्गाला हा साचा मान्यच नाही. आपली सामाजिक रचना स्त्री- पुरुष नात्यांना निर्घूणपणे या साच्यांमध्ये कोंबत जाते. एकदा विवाह झाला म्हणजे कायमचे एकत्र राहणे ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी, विश्वास हे कोणत्याही नातेसंबंधांचे मूळ आहे. लैंगिकतेसाठी विवाह करणे आणि परस्पर लिंग भावाचा आदर बाळगून नाते जपणे या परस्पर भिन्न बाबी आहे. विशिष्ट वयात जोडीदाराला तिसऱ्या व्यक्तीचे आकर्षण वाटू लागणे हे स्वाभाविक असते. ते दोघांनीही समजून घेतले तर नाते टिकते. प्रत्येक नातेसंबंधाला शरीर सुखाची जोड देणे योग्य नाही. त्याही पलिकडे जाऊन भावनिक, वैचारिक, सांस्कृतिक अशा विविध पैलूंनी नाते तयार होत असते. परस्परांचा आदर बाळगून ते मान्य केले नाही तर अहंकार आणि इर्षा जाग्या होतात. याच वळणावरून नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो.
स्त्री – पुरुष नातेसंबंधांमधला तरल धागा आणखी सविस्तर उकलून दाखवत अनुराधा मोहनी म्हणाल्या, माणूस हा अनादी कालापासून सामाजिक प्राणी आहे. तो कधीही एकटा राहू शकतच नाही. जगण्याच्या प्रत्येक वळणावर त्याला नात्यांची गरज असते. लग्न हा अमूक एखाद्यावर ताबा अथवा सत्ता नसते. पती- पत्नीचे नाते हे कधीही परिपूर्ण नसते. भांडण आणि वाद नैसर्गिक आहे. कोणतेही नाते फुलण्यासाठी माणूसकीचा स्थायी भाव गरजेचा असतो. पुरुष हा सत्तेचा वाहक बनला की नात्यांमध्ये दुरावा वाढीला लागतो. नात्यांची विण बंधनांमध्ये करकचून बांधण्या एवजी त्याला सैल सोडले तर घुसमट, दांभीकपणा थांबून नाते फुलायला सुरुवात होते. तेव्हाच स्त्री- पुरुषातले नाते जबाबदारीच्या वळणावरून कर्तव्य आणि सहवासातून संवादी बनते. एकदा का हा संवाद सुरू झाला की परस्परांविषयी आदर, प्रेम आणि जिव्हाळा वाढतो.