लोकसत्ता टीम

बुलढाणा: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाचे अमरावती विभाग नेते तथा बुलढाण्याचे पक्ष निरीक्षक विलास पारकर देखील यामुळे थक्क झाल्याचे चित्र आहे. पारकर यांनी तसे बोलूनही दाखविले. गायकवाड यांनी अर्ज भरल्यावर काही मिनिटांनी पक्ष निरीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले.

आणखी वाचा-‘मोदींची गॅरंटी’चा प्रचाररथ अन् आचारसंहितेचा भंग… नेमकं काय घडलं?

यावेळी ते म्हणाले, गायकवाड अर्ज भरणार हे मलाही ठाऊक नव्हते. आज मी सकाळपासून आमदार गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात बसून होतो. कार्यालयात कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी होती. मात्र आमदार गायकवाड अर्ज भरणार हे मलाही ठाऊक नव्हते. आता त्यांनी अर्ज भरला आहे. जुनेजानते शिवसैनिक म्हणून त्यांना अर्ज भरण्याचा अधिकार आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांचा ‘आशीर्वाद’ आहे का, असे विचारल्यावर , ते म्हणाले की त्यांना मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद आहे. त्यांनी अर्ज भरला आहे. मात्र अंतिम निर्णय ‘सीएम’ साहेबच घेतील. आज मुख्यमंत्री व गायकवाड यांच्यात चर्चा झाली. त्याचा तपशील मला माहीत नाही, असे सांगून पारकर यांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला.