लोकसत्ता टीम

अकोला : ‘मोदींची गॅरंटी’चे दोन प्रचार रथ जिल्हाधिकारी कार्यालयापासून १०० मीटरच्या आत उभे केल्याने आचारसंहितेचा भंग झाला आहे. या प्रकरणी दोघांविरूद्ध शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अकोला मतदारसंघातील भरारी पथक क्र. ५ चे प्रमुख नीलेश बायस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटरच्या आत दोन मिनी ट्रक वाहने (क्र.एमएच २४ जे ९६१९ व क्र.एमएच २५ पी ४३७३) लावण्यात आल्याचे पथकाला आढळले. वाहनाच्या दोन्ही बाजूंवर फलकावर ‘विकसित भारत’, ‘मोदींची गॅरंटी’ व कमळ पक्षचिन्ह आदी प्रचार मजकूर आढळून आला. पथकाच्या सदस्यांनी तत्काळ नोंद घेतली. पथकाने चालकांना विचारणा केल्यावर वाहनावरील फलक काढून दोन्ही वाहनचालक वाहने घेऊन परिसरातून निघून गेले. अंबादास नरवाडे (पार्डी, ता. जि. हिंगोली) व निवृत्ती जाधव (किरोडा, ता. लोहा, जि. नांदेड) अशी चालकांची नावे आहेत.

आणखी वाचा-‘आरएसएस’चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर…

या वाहनांना परवानगी प्राप्त नसल्याचे व प्रचार मजकूर असलेले वाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरात आणल्याने आचारसंहितेचा भंग झाला. भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा नोंदवण्याची तक्रार शहर कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ठाणेदार यांच्याकडे छायाचित्रणाची सीडी, वाहनचालकांचे आधारपत्र व माहिती देण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.