अकोला : बंदूकवाला फटाका कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बेलुरा ते तांदळी फाट्यावर मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या हादऱ्यामुळे भिंतीला तडे जाऊन खोली कोसळली. फटाके जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बेलुरा ते तांदळी फाट्यावर ताहीर अब्बाशी शकील अहेमद यांचा बंदूकवाला नावाने फटाक्याचा कारखाना आहे. या फटाका केंद्रामध्ये फटाके तयार करण्याचे काम सुरू होते. या फटाका केंद्रात काम करण्यासाठी ३५ मजूर उपस्थित होते. बहुतांश मजूर फटाका कारखान्यापासून जवळपास ५०० मीटर अंतरावर जेवायला गेले होते. मजूर जेवायला बसणार तेवढ्यात या फटाका कारखान्यामध्ये अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने भिंतीला तडे जाऊन संपूर्ण खोली कोसळली. भिंतीचे तुकडे जवळपास दोनशे मीटर दूरवर उडाले. या घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. शेख रज्जाक शेख गुलाब (७०, लक्ष्मीनगर, अकोट फैल) असे मृताचे नाव आहे. सुरेश नामदेव दामोदर (५०, रा. तांदळी), धम्मपाल सीताराम खंडेराव (३६, रा. तांदळी), महेश किसन खंडेराव (३२, रा. तांदळी), रिना मंगेश खंडेराव (३०, रा. तांदळी) आदींसह पाच मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमी मजुरांवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा. यवतमाळ: निसर्गातील बदलावरून लावा पावसाचा अंदाज; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना कानमंत्र फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटामागील कारण अद्याप कळू शकले नाही. या स्फोटामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागासह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर पाण्याचा मारा करून ती नियंत्रणात आणली. पातूर पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हेही वाचा. बुलढाणा: “सातएक महिन्यांपूर्वी मुकादमाने माझ्या मुलाला गाडीत डांबून नेलं, तवापासून तो कुठं हाय देवालेच ठाऊक, त्याची भेट नाय की फोन नाय….” मोठी जीवितहानी टळली फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला, त्यावेळी बहुतांश मजूर फटाका कारखान्यापासून दूर जेवणासाठी गेले होते. त्यामुळे या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे.