अकोला : एका घराचा स्लॅब टाकण्यात आल्यावर सिमेंट काँक्रेटचे मिक्सर बाहेर काढताना १४ मजुरांना विजेचा जोरदार धक्का बसल्याची घटना जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात घडली. या दुर्दैवी घटनेमध्ये एका अल्पवयीन मजुराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या वडगाव रोठे गाव येथील रहिवासी वसंता बरिंगे यांच्या घरी स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले. बांधकाम आटोपल्यानंतर सिमेंट काँक्रेटचे मिक्सर बाजूला काढले जात होते. त्यावेळी अचानक विजेचा प्रवाह त्यामध्ये आला. या मिस्करचा विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने त्यामध्ये विजेचा प्रवाह आला. त्यामुळे मिक्सरला स्पर्श केलेल्या सर्व १४ मजुरांना विजेचा जबरदस्त झटका बसला. या घटनेमध्ये एका अल्पवयीन मजुराचा मृत्यू झाला आहे. ओम प्रकाश केशवराव जांभळे (वय १७) असे मृत बांधकाम कामगार मुलाचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. विजेचा धक्का बसलेल्या मजुरांपैकी सात ते आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर तेल्हाराच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या धक्कादायक व दुर्दैवी घटनेनंतर संबंधित बांधकाम ठेकेदार घटनास्थळावरून पसार झाला. तेल्हारा पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मृत कामगाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
घरावर स्लॅब टाकण्यात आल्यानंतर सिमेंट काँक्रेटचे मिक्सर काढताना त्यात विजेचा प्रवाह येऊन अल्पवयीन कामगार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गरीब कामगार बांधकामावर श्रम करून मिळणाऱ्या मजुरीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. या प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यावर कुटुंबावर दुःखासह आर्थिक संकट देखील कोसळते. या सर्व पार्श्वभूमीवर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बांधकाम कामगार आपल्या जीवावर उदार होऊन काम करीत असतात. या कामगारांना पुरेशा सुरक्षा साधनांचा पुरवठा संबंधित ठेकेदाराकडून केला जात नाही. त्यामुळे दुर्घटना होऊन कामगारांना जीव देखील गमवावा लागतो. याच प्रकारची घटना तेल्हारा तालुक्यात घडली. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.