अकोला : सावत्र बापाने नऊ वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून जीव घेतल्याची संतापजनक घटना जिल्ह्यातील अकोट तालुक्यात घडली. दर्शन वैभव पळसकर (९) असे निष्पाप चिमुकल्याचे नाव आहे. सावत्र बाप आकाश साहेबराव कान्हेरकर याने त्याचा मित्र गौरव वसंतराव गायगोले याच्या मदतीने आपल्या सावत्र मुलाची निर्घृण हत्या केली. या घटनेमागे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. आपल्या संपत्तीमध्ये सावत्र मुलाचा वाटा राहू नये म्हणून निर्दयी बापाने चिमुकल्याचा जीव घेतला. बेपत्ता म्हणून शोध घेत असलेल्या चिमुकल्याचे अखेर ‘दर्शन’ घडलेच नाही.
अकोट शहर पोलीस ठाण्यात २ जुलै रोजी दर्शन पळसकर हा घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या आईने अकोट शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस तपासात त्यांना सावत्र वडिलांवर संशय आला. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. दर्शन आपल्या सावत्र वडिलांसोबत जाताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी सावत्र बाप आकाशची कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या मित्रासोबत दर्शनला दुचाकीवरून जंगलात नेले आणि त्या ठिकाणी गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले.
आरोपीने गुन्हा कबूल करताच अकोट पोलिसांनी तत्काळ मृतदेहाची शोधमोहीम राबवली. ७ अधिकाऱ्यांसह ६० पोलीस कर्मचाऱ्यांनी सलग १२ तास जंगल परिसरात शोध घेत मृतदेह शोधून काढला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दर्शनवर लैंगिक अत्याचार झाल्याचा देखील प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून उत्तरीय तपासणी अहवालातून ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोट पोलीस पुढील तपास करीत आहेत. संपत्तीची लालसा व सावत्रपणातून एखादी व्यक्ती किती टोकाला जाऊ शकते, हे अकोट येथील घटनेवरून स्पष्ट होते. समाजातून आरोपींविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
केवळ ३०० रुपयांच्या मोबदल्यासाठी हत्येच्या गुन्ह्यात सहभाग
आपल्या सावत्र मुलाची हत्या करण्यासाठी निर्दयी बाप आकाश याने आपल्या मित्राला केवळ ३०० रुपयांच्या मोबदल्यात गुन्ह्यात सहभागी करून घेतले होते. गौरव गायगोले नावाच्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.