अकोला : दोन अफगाणी नागरिकांनी चक्क स्वत:चे भारतीय मतदान कार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे. पोलीस चौकशी दरम्यान हा प्रकार समोर आला. या प्रकरणात आरोपी अफगाणी नागरिकांवर शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत दोन अफगाणी नागरिक गेल्या काही दिवसांपासून राहत आहेत. त्या विदेशी नागरिकांनी दीर्घ मुदतीचा व्हीसा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी त्यांनी अर्ज केला होता. जिल्हा विशेष शाखेतील विदेशी विभागात कार्यरत सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनिल धामोडे यांनी अफगाणी नागरिक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान यांचा दीर्घ मुदत वाढीचा व्हीसा मंजुरीसाठीचा अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्यांना कार्यालयात बोलावले. विदेशी नागरिकांकडे असलेल्या कागदपत्रांची सविस्तर पडताळणी करण्यात आली. या कागदपत्रांमध्ये त्या विदेशी नागरिकांकडे भारतीय निवडणूक आयोगाचे मतदान कार्ड आढळून आले आहे. अफगाण नागरिक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान यांनी भारताचे नागरिक नसताना येथे वास्तव्य करण्यासाठी मतदान कार्ड तयार करून घेतल्याचे समोर आले. या प्रकरणी अफगाण नागरिक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान यांच्या विरुद्ध कलम ३१८ (४), ३३६ (३), ३३७, ३३९, ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम १३ (१) विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : नागपूरच्या पिपळा फाटा भागात एक कुटुंब छतावर अडकून; महापालिका म्हणते, “आमची हद्द नाही…”

अनेक प्रश्न अनुत्तरीत

दोन्ही अफगाण नागरिकांकडे भारताचे नागरिकत्व नसताना त्यांनी अवैधरित्या मतदान कार्ड तयार केले. यासाठी त्यांना नेमके कोणी सहकार्य केले, हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. वास्तव्याशिवाय त्या अफगाणी नागरिकांचा दुसरा काही हेतू होता काय? त्या दोन्ही अफगाणी नागरिकांची नेमकी पार्श्वभूमी काय? गुन्हेगारी कारवायांमध्ये त्यांचा हात तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

हेही वाचा : देशातील कोणत्याही रुग्णालयात उपचार , शस्त्रक्रिया करायचीय? मग ‘येथे’ संपर्क करा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंत्रणेच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

विदेशी नागरिक भारतात येऊन राहतात. त्यातच भारतीय निवडणूक आयोगाचे मतदान कार्ड देखील अवैधरित्या ते तयार करतात. यावरून यंत्रणेच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून सर्व दोषी समोर येण्याची गरज आहे.