अमरावती : अनुदानाअभावी अमरावती जिल्ह्यातील शिवभोजन थाळी योजनेची १५ केंद्रे बंद पडली असून उर्वरित २४ केंद्रे कशीबशी सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे या केंद्रांचा निधी अडवून ठेवण्यात आल्याचा आरोप केंद्र चालकांनी केला आहे.
गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या १० रुपयांत शिवभोजन थाळी योजना २०२० मध्ये सुरू केली. परंतु शिवभोजन थाळी केंद्रांना आता घरघर लागली आहे. जिल्ह्यातील ३९ केंद्रांपैकी १५ केंद्रांना टाळे लागले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडला असून, त्याचा फटका शिवभोजन थाळीला बसू लागला आहे.
अमरावती जिल्ह्यातील २४ केंद्रांना गेल्या ४ महिन्यांचे अनुदान न मिळाल्याने केंद्रचालक अडचणीत सापडले आहेत. करोनाकाळात तत्कालीन शासनाकडून ही थाळी मोफत दिली जात होती. आता पुन्हा ही थाळी दहा रुपयांत देण्यात येत आहे. यासाठी केंद्रचालकांना ४० रुपये अनुदान देण्यात येते. मात्र हे अनुदान महागाईमुळे अपुरे पडत आहे.
या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना १० रुपयांच्या सवलतीच्या दरात दोन चपात्या, एक वाटी भाज्या, एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ असे एक वेळचे जेवण देण्यासाठी जिल्ह्यात एकूण ३९ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या यापैकी फक्त २५ केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्यात दरदिवशी सरासरी १ हजार २०० लाभार्थी या थाळीचा लाभ घेत असतात.
निधी वितरणात सुधारणा करण्याची मागणी
शिवभोजन केंद्र चालकांचे ३ ते ४ महिन्यांचे अनुदान प्रलंबित असल्याने अनेक केंद्रे बंद पडली. इतर शिवभोजन केंद्रांच्या चालकांकडून अनुदानाची रक्कम वेळेवर न आल्याने अन्न व पुरवठा विभाग प्रशासनाला केंद्रे बंद करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर आता दरमहा बिले मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असूनही जिल्ह्यातील अनेक शिवभोजन केंद्रांचे ३ ते ४ महिन्यांचे अनुदान प्रलंबित आहे.
प्रत्येक थाळीमागे असे मिळते अनुदान
शहरांसाठी एका थाळीमागे शासन ४० रुपये अनुदान देते. १० रुपये लाभार्थ्यांकडून घेतले जातात. ग्रामीण भागासाठी ३५ रुपये शासन, तर १० रुपये लाभार्थी देतात. अनुदानातून शिवभोजन केंद्र चालविले जातात. दुपारी ११ वाजतापासून सुरू होणारे केंद्र २ वाजतापर्यंत सुरू राहते. शिवभोजन केंद्रात गरजुंसाठी अन्न शिजविले जात असले तरी दररोजचा मेनू बदलता ठेवला जातो. हंगामानुसार मेनूमध्ये विविध पदार्थाचा समावेश केंद्र संचालकांकडून केला जातो.