अमरावती : बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. दारूच्या नशेत उद्भवलेल्या वादातून दोन मित्रांनीच तरुणाची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पसार झालेल्या दोन्ही आरोपींना हैदराबादवरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी बेनोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

राहुल अशोकराव तायडे (३९) रा. आष्टी, वर्धा असे मृत युवकाचे नाव आहे. तर गौरव उर्फ सौरव गोपाल परतेती (२०) रा. झटामझिरी, वरूड व गोपाल महादेवराव कुमरे (२३) रा. आष्टी, वर्धा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवार, १६ जुलै रोजी बेनोडा ठाण्याच्या हद्दीतील आष्टी-राजुरा बाजार मार्गावरील वघाळजवळ रस्त्याच्या कडेला नाल्यामध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मृताची ओळख पटली. या प्रकरणी मृत राहुलचा भाऊ रोशनच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्याचवेळी कुटुंबीयांनी १२ जुलै रोजी आष्टी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणात घातपाताची शक्यता लक्षात घेऊन तपास आरंभला.

११ जुलै रोजी सायंकाळी राहुल हा मित्र गौरव परतेती व गोपाल कुमरे यांच्यासोबत गेला होता. तेव्हापासून गौरव व गोपाल हे मोबाइल बंद करून गावात नसल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला. त्यानुसार पथकाने त्यांच्याबाबत माहिती काढली. त्यावेळी ते हैदराबाद येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने हैदराबाद गाठून गौरव व गोपालला ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली. आम्ही राहुलसोबत त्याच्याच दुचाकीने वरूडला गेलो. तेथे मद्यप्राशन केल्यावर राजुरा बाजार परिसरातील हॉटेलमध्ये जेवण केले. रात्री आम्ही आष्टीला जाण्यासाठी निघालो. मार्गात राहुलने दारूच्या नशेत आम्हाला शिवीगाळ केली. त्यामुळे आमच्यात वाद झाला. आम्ही दुचाकी थांबवून राहुलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे तोल जावून तो खाली पडला. आम्ही त्याला पायाने लोटून लगतच्या नाल्यात ढकलले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालथ्या अवस्थेत त्याच्या डोक्यावर व पाठीवर पाय देऊन त्याला चिखलात दाबले. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही त्याची दुचाकी व मोबाइल घेऊन तेथून पळ काढल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध बेनोडा ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.