अमरावती: प्राप्तिकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन एका महिलेची १४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी एक महिलेसह संदीप बाजड, नसुरल्ला शहा (दोघेही रा. अमरावती), कामील, मोहसीन, निरज पांडा (रा. दिल्ली), कदम (रा. खाररोड, मुंबई) व कल्याण रेल्वे जंक्शनवरील एका बीडीओविरूध्द फसवणूक व फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर खापर्डे बगिचा परिसरात राहणाऱ्या महिलेने पोलीस ठाण्यात पोहचून तक्रार दाखल केली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे परिचयाचे आहेत. तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यांच्या बेरोजगार मुलाला नोकरी मिळवून देतो, अशी बजावणी केली. त्यासाठी त्या महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. १ सप्टेंबर २०१९ ते २ मे २०२२ रोजी दरम्यान महिलेने दिलेली रक्कम १४ लाख ५० हजारांपर्यंत पोहोचली.

हेही वाचा : गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीला हादरा, जहाल नक्षलवादी नेता गिरीधर याचे पत्नीसह आत्मसमर्पण

त्यानंतर फिर्यादी महिलेच्या मुलाला आरोपींनी प्राप्तिकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यांनी प्राप्तिकर विभागात जाऊन माहिती घेतली असता ते नियुक्तीपत्र बनावट व खोटे असल्याचे उघड झाले. त्यामुळे महिलेला फसवणुकीची जाणीव झाली. त्यांनी आरोपींना त्याबाबत जाब विचारला.

त्यानंतर दोन वर्ष आरोपींनी ती १४.५० लाख रुपयांची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन वर्ष उलटल्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने महिलेने अखेर पोलीस उपायुक्तांकडे धाव घेतली. शहर कोतवाली पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या ११ मे रोजीच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या वर्षीही अशीच एक घटना उजेडात आली होती. रेल्वेत नोकरी लावून देण्याची बतावणी करून एका महिलेची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातही संदीप बाजड याचा आरोपींमध्ये समावेश होता.

हेही वाचा : निवडणूकीत काय ‘ताल’ झाला हे सर्वांसमोर विचारा; निरीक्षक आ. प्रवीण दटकेंवर आ. दादाराव केचे संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवसारी रोडवरील प्रिया पार्क येथे राहणाऱ्या सचीन नामक मुलाला रेल्वेत नोकरी लावून देण्याची बतावणी करण्यात आली. मोठे पद असल्याने काही लाख रुपये भरले तर थेट नियुक्तीपत्र देतो, अशा थापा मारण्यात आल्या. दरम्यानच्या काळात अनेकदा मोठी रक्कम घेऊन सचीनला रेल्वेमध्ये नोकरीचे खोटे दस्तावेज देण्यात आले. नियुक्तीपत्र व दुसऱ्या पानावर इंग्रजीत अटी शर्ती असलेल्या त्या दस्तावेजावर खोटी शासकीय मुद्रा व स्वाक्षरी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. फसवणुकीच्या या मालिकेत सात ज्ञात आरोपींसह सचिन व त्याच्या आईला अन्य सातजण देखील भेटले, ते सातही जण वेगवेगळ्या भूमिकेत होते.