अमरावती : उपमुख्‍यमंत्री अजित पवार हे अमरावती येथील कार्यक्रम आटोपून नागपूरकडे परत जात असताना तिवसानजीक शनिवारी सायंकाळी प्रकल्‍पग्रस्‍त मोर्चेकऱ्यांनी त्‍यांचा ताफा अडविण्‍याचा प्रयत्‍न करीत जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भातील प्रकल्‍पग्रस्‍त शेतकऱ्यांची अल्‍पमोबदल्‍यात जमीन खरेदी करून त्‍यांची लूट करण्‍यात आली, त्‍यामुळे सरकारने भूसंपादन कायद्यानुसार मोबदला द्यावा या मागणीसाठी प्रकल्‍पग्रस्‍तांचा पायी मोर्चा नागपूरकडे निघाला आहे. उपमुख्‍यमंत्री अजित पवार हे शनिवारी एकदिवसीय अमरावती दौऱ्यावर आले होते.

हेही वाचा : “नको, नको…मंदिरात राजकीय प्रश्न नको!”, नवाब मलिकांच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रेडाई आणि अहिल्‍यादेवी स्‍त्री शक्‍ती पुरस्‍कार सोहळ्याला उपस्थित राहून ते नागपूरकडे परत जात होते. मोर्चेकरी हे तिवसा येथे पोहोचले होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरच्‍या दिशेने जात होते. अजित पवार यांचा ताफा महामार्गावरून जात असताना प्रकल्‍पग्रस्‍तांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने प्रकल्‍पग्रस्‍तांवर सातत्‍याने अन्‍यायाचे धोरण राबविले असून प्रकल्‍पग्रस्‍त अजूनही न्‍यायाच्‍या प्रतीक्षेत आहेत. गेल्‍या अनेक वर्षांपासून त्‍यांचा लढा सुरू आहे. अनेकवेळा सरकारसोबत चर्चा झाली, पण आश्‍वासनांशिवाय पदरी काहीच पडले नाही, असा विदर्भ बळीराजा प्रकल्‍पग्रस्‍त संघर्ष संघटनेचा आरोप आहे.