भंडारा : जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीच्या विशाल पात्राला मागील अनेक वर्षांत अभिशाप ठरत असलेला जलकुंभीचा (इकॉर्निया)विळखा सुटता सुटत नाही. या जलकुंभीचे वाढते प्रस्थ जैवविविधतेला धोकादायक ठरू लागले आहे. आजवर यासाठी विविध उपाय केल्यानंतरही जलकुंभीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. मात्र, आता जैविक पध्दतीने या जलकुंभीवर निर्मूलन शक्य होणार आहे. जलकुंभीच्या नायनाटासाठी आता कीटकांची मदत होणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास संशोधन क्षेत्रातील ही एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.

जलकुंभी अर्थात इकॉर्निया ही एक पाण्यात तरंगणारी वनस्पती आहे. तिला बेंगाल टेरर म्हणूनही ओळखले जाते. मुख्यतः ही वनस्पती ब्राझीलची असून ती भारतासह जगभरात पसरली आहे. एका रोपाला आठ ते दहा जांभळ्या रंगाची आकर्षक फुले लागतात आणि त्यापासून प्रत्येक वर्षी एक हजार बीज तयार होतात. त्यामुळे ही वनस्पती अत्यंत वेगाने वाढते.

भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगेला जलकुंभिने गिळंकृत केले आहे. ही वनस्पती पाण्यावर एखाद्या लॉनसारखी पसरली आहे. पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करण्यासोबतच सूर्यकिरणेही पाण्यापर्यंत पोहोचत नाहीत. पाण्यातील ऑक्सिजनच्या मात्रेत अडथळा निर्माण करते. त्यामुळे जल वनस्पती, मासे व इतर प्राणी मृत्युमुखी पडतात. मासेमारीवर त्याचा परिणाम होतो.

ही एक गंभीर समस्या आहे. काही वर्षांपूर्वी भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वनस्पती काढता यावी म्हणून विशेष यंत्र खरेदीसाठी निधीची तरतूदही करण्यात आली होती. याशिवाय यासाठी कोट्यवधींचा निधीही खर्च करण्यात आला आहे. मात्र, आजही नदी, जिल्ह्यातील काही तलावांमध्ये जलकुंभीचे अस्तित्व कायम आहे.

जलकुंभीच्या नियंत्रणात जैविक नियंत्रण अत्यंत प्रभावी ठरू शकते. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या साकोली येथील कृषी विज्ञान केंद्राने जलकुंभीच्या उच्चाटनासाठी एक प्रयोग हाती घेतला आहे. नियोचेटीना नावाचा कीटक यावर रामबाण ठरू शकतो. साकोली विज्ञान केंद्रांकडून ३,५०० हजार नियोचेटीना नामक कीटक जबलपूर येथील डायरेक्टर ऑफ विड रिसर्च येथून खरेदी करून जलकुंभी असलेल्या ठिकाणी सोडले जात आहेत.

काल लाखनी येथील ऑक्सीजन पार्क तलावाच्या परिसरात असलेल्या जलकुंभीवर काही कीटक सोडले तर काही कीटक पुढच्या काही दिवसांत कारधा येथील वैनगंगेच्या पात्रात आणि लाखांदूर येथील जलपात्रात सोडण्यात येतील. या कीटकांकडून जलकुंभी खाल्ली जाऊन ती सुकू लागते आणि तिचा समूळ नाश होतो. एक प्रयोग, जैविक नियोजनाचा भाग म्हणून याकडे पाहिले जात असले तरी भंडारा जिल्ह्यातील जलकुंभीच्या अस्तित्वाला संपविण्यासाठी नक्कीच हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे.

विशेष म्हणजे कोल्हापूर येथील पंचगंगा नदी पात्रातही जलकुंभीसाठी असा प्रयोग करण्यात आला होता ज्याचे सकारात्मक परिणाम पहावयास मिळाले. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात हा प्रयोग नवा अध्याय लिहू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलकुंभीचा नाश आवश्यक : डॉ. उषा डोंगरवार

जलकुंभी वनस्पतीची समस्या जिल्ह्यात मोठी आहे. ती नष्ट करण्याच्या दृष्टीने निओजेटीना नावाचे कीटक आम्ही सोडणार आहोत. प्रत्यक्ष निर्धारित केलेल्या ठिकाणी ते सोडणे सुरू आहे. या कीटकांची पैदासही त्याच ठिकाणी होऊन त्याचा फायदा भविष्यातही जलकुंभी नायनाट्यासाठी होईल, अशी प्रतिक्रिया कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. उषा डोंगरवार यांनी दिली.