scorecardresearch

भंडारा : वगार खाऊन वाघाची वडस्याकडे कुच – पाऊलखुणा कॅमेऱ्यात कैद

तब्बल १२ जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी १’ या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

भंडारा : वगार खाऊन वाघाची वडस्याकडे कुच – पाऊलखुणा कॅमेऱ्यात कैद
भंडारा : वगार खाऊन वाघाची वडस्याकडे कुच – पाऊलखुणा कॅमेऱ्यात कैद

तब्बल १२ जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी १’ या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मंगळवारी एका मासेमाऱ्याला तर बुधवारी त्याला आकर्षित करण्यासाठी बांधलेल्या रेडकूला फस्त करत आता या वाघाने वडस्याच्या दिशेने कुच केले आहे. त्याच्या पाऊलखुणा कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. मात्र तो कधीही परत येऊ शकतो. त्यामुळे वाघाला जेरबंद करेपर्यंत परिसरातील नागरिकांनी जंगलात न जाण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात सीटी-१ नावाच्या वाघाची दहशत आहे. तालुक्यातील दोन जणाचा बळी घेतल्यानंतर त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागासह तीन जिल्ह्यांतील शीघ्रकृती दलाचे पथक आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक बुधवारी इंदोरा येथे दाखल झाले. जंगलात ठिकठिकाणी अंदाजे ३० ते ३५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. ४ ते ५ मचाण उभारण्यात आल्या असून मचाण उभारण्याचे काम सुरूच आहे.

हेही वाचा : तुम्ही भव्य दिव्य महामार्ग बांधा पण … गडकरी साहेब, जरा इकडेही लक्ष द्या

हा वाघ अनेक वनपरिक्षेत्रात सतत भ्रमंती करीत आहे. त्यामुळे त्याचा अधिवास नेमका कोणता हे सांगता येत नाही. मात्र तो लाखांदूर वन परिक्षेत्रात बराच काळ होता. ‘ एलटी १’ वाघ लाखांदूर वन परिक्षेत्रात आल्यानंतर सीटी १ या वाघाने काही दिवस वडसा वनपरिक्षेत्रात मुक्काम ठोकला. आता तो परत आला. काही महिन्यातच त्याने तालुक्यातील २ जणाचा बळी घेतला. मागील तीन दिवसांपासून त्याला जेरबंद करण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. त्याला जेरबंद करे पर्यंत शोधमोहीम सुरूच राहणार आहे. लाखांदूर ते वडसा हे अंतर ८ ते १० किलोमीटर आहे. त्यामुळे वाघाचे आवागमन याच परिसरात सुरू आहे.

हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारसाठी ‘वाईन’ झाली आता ‘फाईन’ – वडेट्टीवार

पावसामुळे अडथळे

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाघाच्या पावलांचे ठसे पुसले जात आहेत. शिवाय पावसाळ्यात झुडपी जंगल वाढल्यामुळे शोधकार्यातही अडथळा येत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या