बुलढाणा: ‘पंढरीच्या राया प्रभू दिनानाथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही’ या संत श्रेष्ठ नामदेवांच्या अभंगाप्रमाणे भावविवश होत विदर्भ पंढरी शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीने मागील १० जुलै रोजी पंढरपूरचा निरोप घेतला. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सातशे वारकऱ्यांचा समावेश असलेल्या या पालखीने स्वगृही शेगावकडे प्रस्थान केले. सध्या मराठवाडामध्ये असलेली ही पालखी येत्या २३ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यानंतर सुवर्ण महोत्सवी पालखी स्वगृही म्हणजे शेगाव येथे ३१ जुलै रोजी डेरेदाखल होणार आहे.
आषाढी एकादशी वारीत आलेली ही पालखी पंढरपूर येथील श्री गजानन महाराज संस्थान शाखा पंढरपुर येथे ९ जुलैपर्यंत विसावली होती. येथून श्रींचा पालखी सोहळा पहाटे ३ वाजता काल्याचे कीर्तनाकरता गोपाळ पुरी येथे मार्गस्थ झाला. श्री गजानन महाराज संस्थानची पालखी पंढरपूरकडे शेगाववरून सातशेच्यावर वारकऱ्यांसह २ जुन रोजी पंढरपूरकडे रवाना झाली होती. ४ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचली. आषाढ एकादशी उत्सवसाठी ४ ते ९ जुलै श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामी होती.
श्रींच्या पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास १० जुलै रोजी पंढरपूर येथून सुरू झाला. परतीच्या प्रवासादरम्यान पहिला मुक्काम करकंब, ११ जुलै कुईवाडी मुक्काम, १२ ला उपळाई स्टेशन मुक्काम, १३ ला भगवान बार्शी येथे मुक्काम, १४ ला भुम मुक्काम, १५ ला. चौसाळा मुक्काम, १६ ला. पाली १७ ला बीड, १८ ला. गेवराई , १९ ला.शहापूर मुक्कामी होती.२० ला लालवाडी मुक्काम करून २१ व २२ ला जालना मुक्कामी राहणार आहे.
२३ ला पालखी बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करणार आहे. मा जिजाउंचे माहेर असलेल्या सिंदखेडराजात पहिला मुक्काम राहणार आहे. २४ ला बिबी मुक्काम, २५ ला. सरोवर नगरी लोणार , २६ ला.मेहकर , २७ ला जानेफळ , २८ ला शिर्ला नेमाने , २९ ला आवार आणि , ३० ला खामगाव मुक्कामी राहणार आहे. ३१ ला पालखी शेगाव येथे दाखल होणार आहे.
तेराशे किलोमीटरचा प्रवास
श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५६ वे वर्षे असून पायदळ वारीची यशस्वी परंपरा कायम आहे. शेगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते शेगाव असा जाण्यायेण्याचा मिळून १३०० कि.मी. चा पायदळ प्रवास वारकरी पूर्ण करणार आहेत.