बुलढाणा : क्षुल्लक कारणावरून पुतण्याने पित्यासमान काकाची हत्या केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील सोनज इसबपूर येथे घडली. कुटुंबीयांसमोर काकांची हत्या करणारा निर्दयी पुतण्या नंतर पोलीस ठाण्यात हजर झाला. आज शनिवार, २९ मार्चला घडलेल्या या थरारक घटनाक्रमामुळे सोनज इसबपूर गावासह संपूर्ण नांदुरा तालूका हादरला आहे.
प्राप्त माहितीनुसार शुभम बोके (२१, रा. सोनज इसबपूर, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. गोपाल मनोहर बोके (४५, रा. सोनज इसबपूर, ता. नांदुरा) असे मृताचे नाव आहे. आरोपी शुभम बोके याच्याकडे ट्रॅक्टर आहे. मात्र, शेतीमध्ये करावयाच्या कामांसाठी आणि खतांची वाहतूक करण्यासाठी काकाने आपला ट्रॅक्टर घेतला नाही, याचा शुभमला राग आला. यामुळे त्याने काका गोपाल मनोहर बोके यांचे घर गाठले. तिथे जाऊन शुभम याने, ‘शेतीच्या कामासाठी आणि खत वाहून नेण्यासाठी माझा ट्रॅक्टर का घेतला नाही?’ असा सवाल करीत गोंधळ घातला. यावेळी गोपाल बोके यांचा मुलगा आणि पत्नी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच घराच्या अंगणात काका-पुतण्यात कडाक्याचा वाद झाला. यामुळे शुभम बोके याने रागाच्या भरात हातातील कुऱ्हाडीने काका मनोहर बोके यांच्यावर घातक हल्ला केला. कुऱ्हाडीचा वार मानेवर लागल्याने मनोहर बोके रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर शुभम नांदुरा पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला. घटनेवेळी उपस्थित मृताचा मुलगा विश्वजीत बोके याने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, १०३(१), ११५(२) नुसार गुन्हा दखल केला आहे. घटनेचा पुुढील तपास नांदुरा ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास पाटील करीत आहेत. दरम्यान, मलकापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाच्या दृष्टीने सूचना दिल्या.