बुलढाणा : देऊळगाव राजा परिसरात एका बंद चार चाकी वाहनात काल रविवारी आढळलेल्या पोलिसाच्या मृतदेहाने पोलीस दल हादरले होते. पोलिसाची हत्या करण्यात असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी जलद गतीने तपास चक्रे फिरविली! काही तासातच प्रकरणाचा छडा लावून आरोपीना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे विस्तृत तपासात निष्पन्न झाले आहे. मृत पोलिसाच्या नात्यातील व गावातील एका स्थानिक पुढाऱ्याने एका कुख्यात गुंडाला सुपारी देऊन पोलिसाला संपविल्याचे आढळून आले. यापूर्वी देऊळगाव राजा परिसरआणि पोलीस दल काल रविवारी, ३० मार्च ला अक्षरशः हादरला होता. देऊळगाव राजा सिंदखेडराजा रस्त्यावरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलसमोरील वनविभागाच्या जागेत मारोती स्विफ्ट वाहनात एका पोलिसाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तपासाअंती पोलीस कर्मचाऱ्याची गळा आवळून होऊन हत्या केल्याचे समोर आले होते.

वेगवान तपास

दरम्यान घटना स्थळी दाखल झालेले पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात उप विभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व त्याची चमू, देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी सुनियोजित वेगवान तपास केला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला दुपारीच ताब्यात घेतले . खून अनैतिक संबंधातून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आतापर्यंत ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीचे नाव बाबासाहेब म्हस्के(४२) असून तो गिरोला खुर्दच्या राजकारणात सक्रिय आहे, त्याची पत्नी माजी सरपंच आहे. सध्याही आरोपी बाबासाहेब म्हस्के याची पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे.अनैतिक संबंधतूनच हा खून झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

आणि… सुपारी

ज्ञानेश्वर म्हस्के हे जालना पोलिस दलात राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिस म्हणून कार्यरत होते. मूळचे गिरोली खुर्द ( राहणार देऊळगाव राजा ) येथील रहिवासी आहेत. ज्ञानेश्वर म्हस्के जालना येथे अंबड चौफुली येथे पत्नी व दोन अपत्यांसह राहत होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बाबासाहेब म्हस्के व मृतक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के सोयरे असून एकमेकाचे मित्र होते. घट्ट दोस्ती होती. या दोस्तीचा बाबासाहेब म्हस्के याने ‘गैरफायदा’ घेतला. त्याचे म्हस्के यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध सुरू झाले. या संबंधात अडसर ठरत असल्यानेच ज्ञानेश्वर म्हस्के यांचा काटा काढायचे बाबासाहेब म्हस्के याने ठरवले होते. त्यासाठी त्याने जालना येथील “टायगर” नामक एका गुंडाला ५ ते ६ लाख रुपये सुपारी दिली होती. त्यांनी २९ मार्चचा दिवस निवडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टायगरने त्याची दोन माणसे त्या कामासाठी बाबासाहेब म्हस्के याच्या ताब्यात दिली. २९ मार्चच्या रात्री देऊळगाव राजा मार्गावरील एका हॉटेल मध्ये बाबासाहेब म्हस्के याने मृतक ज्ञानेश्वर म्हस्के यांना दारू पाजली. हॉटेलचे बिल देखील बाबासाहेब म्हस्के यानेच दिले. सदर प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्यानंतर बाबासाहेब म्हस्के आणि टायगर ने पुरवलेल्या दोन गुंडांनी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा गळा आवळून निर्घृण हत्या केली . मृतदेह गाडीत टाकून गाडी गिरोली खुर्द गावाजवळील आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरील वनविभागाच्या जागेत नेऊन ठेवत आरोपी पसार झाले. रविवारी घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीवरून बाबासाहेब म्हस्के याला ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली..