चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून वरोरा – भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रकाश देवतळे, माजी चंद्रपूर कृऊबा सभापती दिनेश चोखारे यांच्यासह आठ जणांनी रितसर अर्ज करून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात चांगलीच चुरस होणार आहे. दरम्यान कुणबी व तेली समाजाच्या उमेदवारांचा समावेश आहे.

प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी १० जानेवारीपर्यंत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले होते. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनु धोटे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे तथा शिवा राव यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. तर चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व वरोरा येथील डॉ. हेमंत खापने यांनी उमेदवारीसाठी अर्ज दिले आहेत.

हेही वाचा : काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आज मुंबईत; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर…

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याशी संपर्क साधला असता, लोकसभा उमेदवारीसाठी एकूण आठ जणांचे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती दिली. सहा उमेदवारांनी थेट आपल्याकडे अर्ज सादर केले तर दोन इच्छुक उमेदवारांनी शहर अध्यक्ष तिवारी यांच्याकडे अर्ज दिले होते. तिवारी यांनी दोघांचेही अर्ज आपणाला दिले आहेत. आठही इच्छुकांचे अर्ज गुरूवार ११ जानेवारी रोजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती आमदार धोटे यांनी दिली. विशेष म्हणजे काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्युनंतर चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा मतदार संघ मागील सात महिन्यांपासून पोरका आहे. या मतदार संघावर काँग्रेस पक्षाकडून दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनीच प्रथम दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून एकूण आठ इच्छुक उमेदवारांचे अर्ज जिल्हाध्यक्षांकडे आले असले तरी आमदार धानोरकर यांचा दावा प्रबळ मानला जात आहे.

हेही वाचा : मुलीच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना २०१९ मध्ये काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी निवडणुक लढण्यास शेवटच्या क्षणी नकार दिला होता. तसेच त्यावेळी झालेल्या राजकीय हालचालीनंतर बाळू धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा विनायक बांगडे यांनी उमेदवारी मागितली असल्याने चांगलीच रंगत निर्माण होणार आहे.