चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढणार, अशी घोषणा करणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी कोल्हापूर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या दोन दिवसीय राज्य अधिवेशनात हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानात जोरगेवार यांनी काहीतरी सांगितलं. त्यामुळे जोरगेवार आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटाकडून लढणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आमदार जोरगेवार यांनी २०२४ ची विधानसभा निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढणार, अशी भूमिका यापूर्वी मांडली आहे. मात्र, तो पक्ष कोणता, हे त्यांनी सांगितलेले नाही. जोरगेवार भाजपकडून निवडणूक लढणार की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, की शिवसेना शिंदे गट, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, जोरगेवार यांनी कोल्हापूर येथे शिवसेनेच्या राज्य अधिवेशनाला पूर्णवेळ हजेरी लावली. त्यामुळे आता जोरगेवार शिंदे गटाकडून चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील, असे बोलले जात आहे. जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हात पकडून राजकारणात प्रवेश केला.
हेही वाचा : नागपूर ‘एम्स’मध्ये परिषदेच्या आड पदग्रहण समारंभ! ‘या’ कारणाने बुडला महसूल…
मुनगंटीवार यांच्या सोबत सक्रिय असताना २००९ मध्ये सर्वप्रथम भाजपकडून उमेदवारी मागितली. मात्र, भाजपाने नागपुरातील नेते नाना शामकुळे यांना आयात केले होते. यानंतर २०१४ मध्ये पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जावून त्यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. त्याहीवेळी जोरगेवार यांच्या पदरी निराशा पडली होती. अखेर २०१४ मध्ये जोरगेवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून निवडणूक लढविली. त्यावेळी जोरगेवार यांना ५० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जोरगेवार ७५ हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य घेवून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले.
हेही वाचा : …तर विद्यार्थ्यांसह पालकांनाही मिळणार मुख्यमंत्र्यांसोबत स्नेहभोजन करण्याची संधी, काय आहे हा उपक्रम?
आता त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येणे कठीण असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच त्यांनी राजकीय पक्षाचा आधार शोधणे सुरु केले आहे. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच ते शिंदे यांच्या जवळचे देखील आहेत. शिवसेनेच्या राज्य अधिवेशनाला हजेरी लावून जोरगेवार यांनी पक्ष निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.