नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ असणाऱ्या जवळजवळ सर्वच क्षेत्रात मानव-वाघ संघर्ष आहे. पहाटेच्या वेळी जंगलात जाऊ नका, अंधार पडायच्या आत परत या असे सांगूनही गावकरी ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे हा संघर्ष वाढतच चालला आहे. कित्येकदा यात वाघ “व्हिलन” ठरतो आणि मग त्याला कायमचे जेरबंद व्हावे लागते. असाच एक प्रसंग जुनोना गावालगत घडला.
जुनोना बफर क्षेत्रात वास्तव्य असलेल्या वाघाला पाहायला जंगलालगतचे आदिवासी लवाजम्यासह निघाले. ते वाघाला पाहायला निघाले, पण वाघ त्यांच्याच मागावर आहे, हे मात्र त्यांना ठाऊक नव्हते. वाघाने थोड्या वेळाने मार्ग बदलला आणि होणार अनर्थ टळला. वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला.
पावसाळा जवळजवळ संपल्यातच जमा आहे आणि सगळीकडे हिरवळ पसरली आहे. जंगलातील गवतही वाढले आहे आणि त्याठिकाणी वाघ बसला असेल तरीही दिसणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जंगलात जाणे म्हणजे स्वतावून जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सिरकडा बफर क्षेत्रात ‘पाटलीनबाई’ नावाची वाघीण आणि ‘दडीयल’ यांचा बछडा असलेला ‘छोटा दडीयल’ २०१९ मध्ये जन्माला आला. पळसगावमार्गे मोहर्लीच्या जंगलामध्ये साधारणतः दोन वर्षांपूर्वी त्याने आपला अधिवास तयार केला. सुरुवातीच्या काळात त्याला ‘भीम’ या नावाने ओळखले जात होते. मात्र, ‘दडीयल’प्रमाणे त्याला गळ्याभोवती व मानेभोवती केस (दाढी) येऊ लागले. यावरून त्याचे नामकरण ‘छोटा दढीयल’ असे झाले.
अधिवसाच्या लढाईत ज्या “छोटा मटका” वाघाने ने “बजरंग” या वाघाला मारले, त्याच “बजरंग” ला “छोटा दडीयल” ने देखील अधिवसाच्या लढाईत हरवले होते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खातोडापासून मोहर्लीतील तेलिया, जामुनझोरा या भागावर ‘छोटा दढीयल’ने त्याचे साम्राज्य निर्माण केले. पर्यटकांना त्याने कधी निराश केले नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दक्षिणेकडे असणाऱ्या भूभागात आता ‘छोटा दढीयल’चे त्याचे साम्राज्य स्थापन केले आहे. कित्येकदा तो मोहर्लीच्या गाभा क्षेत्रात, ताडोबाकडे जाणाच्या मुख्य डांबरी रस्तावर, कोंडगाव, सितारामपेठ याठिकाणीसुद्धा दिसतो.
मात्र, जुनोना बफर क्षेत्र त्याचे हक्काचे ठिकाण आहे. तीन-चार दिवसांपूर्वी तो जुनोना गाव – दोन च्या मागे आलेला. त्याची चाहूल लागताच गावकऱ्यांच्या लवाजमा त्याला पाहण्यासाठी निघाला. मात्र, वाघच त्यांच्या मागावर होता. ते ज्या रस्त्यावर होते, त्याच रस्त्यावर वाघही होता. मात्र, प्रत्यक्षात वाघ दिसताच गावकरी तेथून पळाले. वाघानेही नंतर त्याचा मोर्चा दुसरीकडे वळवला आणि थोडक्यात अनर्थ टळला. यावेळी पुन्हा एकदा मानव-वाघ संघर्ष झाला असता आणि वाघ मात्र नाहक बदनाम होऊन कायमचा जेरबंद झाला असता.