गडचिरोली : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भजपमध्ये प्रवेश करणार असा दावा करून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ उडवून दिली होती. त्यांनतर दोघांमध्ये टोकाचे शाब्दिक युद्ध रंगले. परंतु भाजपच्या नेत्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वडेट्टीवार प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल बोलणे टाळत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता केवळ पाच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचारासाठी उमेदवार आणि पक्षांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजप प्रवेशाच्या दाव्यावरून गडचिरोली-चिमूर मतदारसंघात प्रचारादरम्यान महायुतीचे नेते धर्मरावबाबा आत्राम आणि महाविकास आघाडीचे नेते वडेट्टीवार यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. वडेट्टीवार यांनी आत्राम यांचा दावा फेटाळून लावला असला तरी प्रचारात आत्राम त्यांच्या वक्तव्याचा वारंवार पुनरुच्चार करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…काँग्रेस अध्यक्ष खरगेंची दीक्षाभूमीला भेट म्हणाले, “आमचा लढा संविधान….”

काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवार संपूर्ण लोकसभा मतदार संघ पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी सभांमधून ते तडाखेबाज भाषणदेखील देत आहेत. एरवी भजप आणि नेत्यांबद्दल वडेट्टीवारांचा आक्रमकपणा गडचिरोलीचे पालकमंत्री फडणवीस यांच्याबाबतीत मवाळ झाल्याचे चित्र आहे. वडेट्टीवार आपल्या भाषणात अशोक नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर अतिशय टोकाची टीका करत आहेत. दुसरीकडे, आत्राम त्यांना तेवढ्याच टोकाचे प्रत्युत्तर देत आहेत. पण फडणवीस आणि वडेट्टीवार आपल्या भाषणात एकमेकांचा उल्लेख टाळत असल्याने दोघांमध्ये नमके काय शिजत आहे, याबद्दल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे आत्राम यांनी केलेला दावा राजकीय ‘स्टंट’ आहे की त्यात काही तथ्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : महाप्रसादातून १२५ जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू, सहा जण गंभीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१८ एप्रिलला गौप्यस्फोट करणार

वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आत्राम विरुद्ध वडेट्टीवार, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हे दोघेही दररोज एकमेकांविरोधात प्रतिक्रिया देत आहेत. अशात वडेट्टीवार यांची भाजपच्या नेत्यांसोबत झालेल्या गुप्त बैठकीची चित्रफीत आपल्याकडे असल्याचा नवा दावा आत्राम यांनी केल्याने राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. रविवारी धानोरा येथे फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत पुन्हा एकदा आत्राम यांनी वडेट्टीवार यांचे नाव न घेता टीका केली व १८ एप्रिल रोजी आपण मोठा गौप्यस्फोट करणार, असे सांगितले. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे ते कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.