बुलडाणा: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसवून स्वतः सारथ्य केले व मादणी ( तालुका मेहकर ) येथील जिल्हा परिषद शाळेत आणले. शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना स्कूल बॅगचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेची पहिली घंटा आज सोमवारी, २३ जूनला वाजली. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. गावातून प्रवेशोत्सव दिंडी वाजत गाजत काढण्यात आली. बैलगाडीतून विद्यार्थ्यांना बसवून त्यांचे सारथ्य स्वतः प्रतापराव जाधव यांनी केले. शाळेत झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शालेय गणवेश देण्यात आले.

केंद्रीय मंत्री जाधव यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास १७ हजार विद्यार्थ्यांना या स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज सोमवारी जिल्हा परिषदेच्या मादणी शाळेपासून करण्यात आला. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे, असा सरकारचा प्रयत्न आहे .

ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत…

मेहकर तालुक्यातील मादणी हे केंद्रीय मंत्री यांचे जन्मगाव आहे. गावात जाधव कुटुंबाचे घर आहेत. प्रत्येक सण ते परिवारसह साजरा करतात.या गावात एका सामान्य शेतकरी परिवारातील प्रताप जाधव या बालकाने मेहकर मतदारसंघाचा तीनदा आमदार, राज्य मंत्री मंडळात पाटबंधारे राज्य मंत्री आणि नंतर सलग चारदा बुलढाण्याचा खासदार होण्याचा व केंद्रीय मंत्री होण्याचा मान मिळविला. त्यामुळे आजचा सोहळा त्यांना भावूक करणारा ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे भाग्य मला मिळाले, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्याच शुभारंभ आज मादणी गावातून झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.