अमरावती : पैशांचा हव्यास भल्याभल्यांची मती गुंग करते. असाच एक प्रकार मोर्शी तालुक्यातील येरला येथील एका तरूण व्यापाऱ्यासोबत घडला.

अजय राठी हा ३१ वर्षीय व्यावसायिक तरूण. ओळखीतील ममता (२७) या युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. ममता ही लग्नास सहज तयार होईना. अखेरीस गेल्या वर्षी प्रेमविवाह झाला. पण, या विवाहाच्या वेळी ममता हिने वेगळीच अट अजय समोर ठेवली. दरमहा १५ हजार रुपये देणार असशील तरच मी तुझ्यासोबत लग्न करेन, असे ममताने अजयला बजावले. अजय हा प्रेमात आकंठ बुडालेला. त्याने आनंदात ही अट मान्य केली. पण, लग्नाच्या काही दिवसांनंतर त्याने ममताला पैसे देणे बंद केले. पती-पत्नीच्या नात्यात पैशांना महत्व नाही, असे त्याने तिला सांगितले. ममता ही काही बोलली नाही, पण त्याचा राग तिच्या मनात होता.

अजयच्या मालमत्तेमधील हिस्सा आणि दरमहा १५ हजार रुपये पुन्हा मिळवायचेच, हा चंग ममताने बांधला. वर्धा जिल्ह्यातील चेतन टांक याच्याशी ममताने संपर्क साधला. चेतन हा ममताचा मावसभाऊ. तिने चेतनला ओळखीची दोन मुले शोधण्यास सांगितले. चेतनने करण मुंदाने आणि स्मित बोबडे या दोन तरूणांची ममतासोबत भेट करून दिली. ममताने या तिघांनाही योजना समजावून सांगितली. त्या मोबदल्यात ममताने या तरुणांना पैसेही दिले. या योजनेविषयी कुणालाही सांगू नका. माझी ओळख दूरपर्यंत आहे, मी सर्वकाही सांभाळून घेईन, अशी फुशारकी तिने मारली.

अजय राठी गेल्या २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पत्नी ममतासह दुचाकीने अकोली रेल्वे फाटकाच्या डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याने जात असताना तोंडाला कापड बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना हॉकी स्टिकने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ व बोटातील अंगठ्या असा ९५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून ते पळून गेले. या प्रकरणी अजय राठी यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात या गुन्ह्यात चेतन टांक याच्यासह त्याचे साथीदार करण मुंदाने व स्मित बोबडे यांचा सहभाग असल्याचे समोर आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या कटाचा उलगडा झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी ममता राठी (२७) रा. येरला, मोर्शी, चेतन टांक (१९), करण मुंदाने (१९) दोघेही रा. आर्वी, वर्धा व स्मित बोबडे (१९) रा. मांगीलाल प्लॉट, अमरावती यांना अटक करण्यात आली आहे.