नागपूर: अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीला प्रस्तावित नागपूर जिल्ह्यातील दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाणीबाबतची जनसुनावणी नागरिकांचा संताप बघून प्रशासनाने पूर्ण झाल्याची घोषणा केली. जमावाची तोंडी मागणी पूर्ण होताच उपस्थित भाजप- काँग्रेस नेत्यांनी मंचावरूनच आपल्या वरिष्ठ नेत्यांना श्रेय देण्यासाठी धडपड सुरू केली. या सुनावणीत नेमके झाले काय? याबाबत आपण जाणून घेऊ या.
सुनावणीची वेळ सकाळी ११.३० होती. परंतु नागरिकांचा संताप बघून १२.१५ वाजतापर्यंत सुनावणी सुरूच झाली नाही. त्यामुळे भाजप नेते राजीव पोद्दार यांनी मंचावर जाऊन नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ते मंचावरील एका खुर्चीवर बसले व आम्ही खाणीला विरोध करणार असून भाजप आमदार डॉ. आशीष देशमुख व आमदार समीर मेघे यांनी त्याबाबत पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. हे बघून नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष व काँग्रेस नेत्या कुंदा राऊतही मंचावर आल्या. त्यांनीही उपस्थितांशी संवाद साधत आपल्या भागातील वाघ म्हणजे काँग्रेस नेते सुनील केदार लवकरच जनसुनावणीत येणार असून ते ही खाण होऊ देणार नाही, अशी गर्जना केली.
नागरिकांच्या विरोधाची नोंद इतिवृत्तात करण्याची मागणी समीर मेघे व कुंदा राऊत यांनी अधिकाऱ्यांना केली. या खाणीला सर्वांचा विरोध असल्याचे इतिवृत्तात नमूद करण्याची मागणी नागरिकांनीही केली. ती प्रशासनाकडून मान्य करण्यात आली. त्यावर काँग्रेस व भाजप नेत्यांनी श्रेय मिळवण्याची धडपड सुरू केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खाणीला विरोध दर्शवणार असल्याचे आशीष देशमुख आणि समीर मेघे यांनी जाहीर केले. सुनावणीनंतर भाजप व काँग्रेस नेते उपस्थित जनसमुदायाला खाण रद्द करण्यासाठी काय करणार, त्याबाबत माहिती देत होते.
राजकीय नेते मंचावर कसे ?
जनसुनावणीत राजकीय पक्षातील नेत्यांना मंचावर बोलने सोडा, उभेही राहता येत नाही. परंतु अदानी समुहाच्या खाणीबाबतच्या जनसुनावणी सूरू होण्यापूर्वी भाजप नेते राजीव पोद्दार मंचावर खुर्चीवर जाऊन बसले. येथून ते नागरिकांना संबोधीत करत होते. त्यानंतर काँग्रेस नेत्या कुंदा राऊत मंचावर पोहचल्या. तर शेवटी आमदार समीर मेघे, सुनील केदारसह इतरही काही नेत्यांनी मंच गाठला. परंतु महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी मात्र जनसुनावणी सुरू असतांना हे नेते मंचावर नसल्याचा दावा केला. हे नेते सुनावणी सुरू होण्यापूर्वी व सुनावणी रद्द झाल्यावर मंचावर आल्याचे त्यांचे म्हणने होते.