नागपूर : “वत्सला”.. ती फक्त एक हत्तीण नव्हती, तर अवघे एक युग ती जगली होती. आशियातील सर्वाधिक जगणाऱ्या या एकमेव हत्तीणीचा मृत्यू झाला, तेव्हा अवघे वन्यजीवप्रेमी हळहळले. केरळमध्ये जन्मलेल्या आणि पन्ना व्याघ्रप्रकल्पात स्थायिक झालेल्या या हत्तीनीने दोन दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी वनखात्यातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. अतिशय सन्मानाने त्यांनी तिला निरोप दिला. नागझिऱ्याची ओळख असलेली आणि आता गडचिरोली जिल्ह्यात स्थिरावलेली “रूपा” हत्तीण देखील वयाच्या नव्वदीच्या टप्प्यावर आहे.

सामान्यतः हत्तींचे सरासरी आयुष्य ५० ते ७० वर्षांदरम्यान असते. काही विशेष परिस्थितींमध्ये काही हत्ती ८० वर्षांपर्यंतही जगतात. विशेषतः चांगली काळजी, योग्य आहार, सुरक्षित अधिवास आणि वैद्यकीय उपचार यामुळे त्यांच्या आयुष्यात वाढ होते. हत्तींच्या आयुष्यावर त्यांची प्रजाती देखील प्रभाव टाकते. आफ्रिकन हत्ती तुलनेत आशियाई हत्तींपेक्षा थोडे अधिक आयुष्य जगतात असे अभ्यासात आढळून आले आहे. हत्ती प्रौढत्व गाठण्यासाठी १५-२० वर्षे घेतात.

१९७१ मध्ये केरळच्या निलांबूर जंगलातून “वत्सला”ला आधी नर्मदापुरम आणि नंतर पन्ना व्याघ्र प्रकल्पात स्थायिक करण्यात आले. त्यानंतर ती इथली कधी झाली ते कळलेच नाही. अखेरच्या श्वासापर्यंत तिने याच जंगलात आयुष्य घालवले. एका शतकाहून अधिक काळाच्या प्रवासात, वत्सला पन्ना व्याघ्रप्रकल्पातील आई, आजी आणि सखी बनली होती. कारण जेव्हा कोणतेही हत्तीणीचे पिल्लू जन्माला यायचे, तेव्हा ती आजीसारखी त्याची काळजी घेत असे. ती अतिशय शांत, मृदू आणि मायाळू होती. यामुळेच प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी ती महत्वाची होती. तिला रोज खैरैयां नाल्यावर आंघोळ घातली जायची, मऊ दलिया दिला जायचा आणि फार प्रेमाने तिची सेवा केली जायची. वाढत्या वयामुळे तिच्या डोळ्यांची दृष्टी गेली होती, त्यामुळे तिला लांब अंतर चालता येत नव्हते, पण तिने कधीही आपले धैर्य गमावले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलिकडेच तिच्या पुढच्या पायाच्या नखांना दुखापत झाली होती. मंगळवारी ती नाल्याजवळ बसली आणि उठू शकली नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुपारी दीड वाजताच्या सुमारास “वत्सला”ने अखेरचा श्वास घेतला.”वत्सला” ही फक्त पन्ना व्याघ्र प्रकल्पाची शान नव्हती, तर ती तिथे येणाऱ्या हजारो पर्यटकांची प्रिय होती. ती हत्तींच्या कळपाची मार्गदर्शक होती, तिथल्या लहान पिल्लांची आई होती आणि जंगलाची मूक संरक्षक होती. तिचे दीर्घायुष्य हे वन विभागाच्या देखरेखीचे आणि पन्नाच्या शांत, सृष्टीस्नेही वातावरणाचे प्रतीक होते. आज ती आपल्यामध्ये नाही, पण तिच्या आठवणी पन्नाच्या जंगलात, तिथल्या हवेतील कणाकणात कायम जिवंत राहतील. तिच्या मृत्यूनंतर वन विभागाने तिचे अंत्यसंस्कारही अत्यंत सन्मानाने केले. तिच्या निघून जाण्याने पन्नाच्या जंगलात एक शांतता पसरली आहे, जणू एखाद्या वयोवृद्धानं शांतपणे निरोप घेतलाय.