नागपूर : दारूच्या आहारी गेलेल्या पुरुषाला कुटुंबाची पर्वा उरत नाही, असे आपण यापूर्वी अनेकदा एकले असेल. अवती भवती अशा अनेक घटना पाहिल्याही असतील. पण माता आणि पिता दोघेही दारूच्या नशेत आकंठ बुडाले असतील तर… घरातल्या चिमुकल्यांची मग कशी होरपळ होते, याचे ज्वलंत उदाहरण शहराला लागून असलेल्या जुनी कामठीत पहायला मिळाले.
दारूच्या आहारी गेलेल्या माता- पित्यांच्या भांडणामुळे भरडले जात असलेल्या तिन बालकांची अक्षरशः भुकने तडफड सुरू होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. याची सुचना मिळताच बाल संरक्षण पथकाने सोमवारी तिन्ही बालकांची मद्यपी माता- पित्यांच्या तावडीतून सुरक्षित सुटका केली.
रोज दारू पिऊन भांडणे करणारे हे जन्मदाते पोटच्या मुलांवर क्रूर अन्याय करत होते. याची सुचना मिळताच कामठी पोलिसांच्या सहकार्याने बाल संरक्षण मंचने ही कारवाई केली. मंचने सोडवेल्या बालकांपैकी ११ आणि ७ वर्षीय मुलगी आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. आई-वडील रोज दारूच्या नशेत राहून आपल्याच मुलांसोबत अमानवीय वर्तन करत असल्याची तक्रार बालसहाय्य हेल्पलाईन १०९८ वर मिळाली होती. जुनी कामठीत राहणारे हे दोघेही मद्य आणि गांजा व्यसनाच्या आहारी गेले आहेत.
दारूच्या नशेत हे दोघेही निष्पाप लहान मुलांना मारझोड करतात, दिवसभर उपाशी ठेवतात, प्रसंगी बांधूनही ठेवतात अशी तक्रार मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ज्यावेळी पथक तिथे पोचले तेव्हा मुले अत्यंत दयनिय अवस्थेत भेदरलेली होती. तर दोघेही जन्मदाते मद्याच्या नशेत होते. पथकाने तत्काळ मुलांची सुटका करत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. स्थानिक पोलिसांना याची सुचना देत पथकाने बालकांचे बालकांचे संरक्षण व काळजी अधिनियम अंतर्गत पोलिसांच्या मदतीने पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनील मेसरे, कायदा व परीक्षा अधिकारी सुजाता गुल्हाने, चाईल्ड लाईन प्रतिनिधी मीनाक्षी मीनाक्षी धडाडे, मंगला टेंभुर्णी यांनी मदत केली. बालहक्क संरक्षणाचा भंग होऊ नये, म्हणून मंचने माता- पित्यांची ओळख जाहिर केली नाही.
जुनी कामठीत जन्मदात्यांकडून मुलांवर होत असलेल्या अमानविय छळाची यापूर्वीही सुचना मिळाली होती. पथकाने आई-वडिलांचे आठ दिवसाांपूर्वी समुदेशनही केले होते. रविवारी मध्यरात्री दोन वाजता पुन्हा मुलांचा छळ होतोय, अशी सुचना मिळाल्यानंतर पथकाने तिने मुलांना त्यांच्या तावडीतून सोडवत बाळगृहात हलवले. -मुश्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
