नागपूर : ७ डिसेंबर पासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्याच्या पूर्व संध्येला विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय घेतला. याला शरद पवार गटाने आक्षेप घेतला आहे.
राष्ट्रवादीची कोणाची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यालय कोणाच्या ताब्यात जाणार याकडे लक्ष लागले होते.
कालपर्यंत एकाही गटाने त्यावर दावा केला नव्हता. त्यामुळे दोन्ही गट एकाच कार्यालयात बसतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अधिवेशनाच्या एक दिवस आधी विधानसभा अध्यक्षांनी कार्यालय अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय घेतला. यावर शरद पवार गट विधानसभा अध्यक्षांकडे आक्षेप नोंदवणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यावर आयोगाने शिंदे गटाला अनधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यामुळे शिंदे गटाला कार्यालय दिले होते. त्यामुळे दोन गटात वाद झाला होता. त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.