नागपूर : मध्य भारतातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर शहराचा समावेश देशातील झपाट्याने विस्तारीत होणाऱ्या शहरांमध्ये केला जातो.समृद्धी महामार्गामुळे देशाची राजधानी मुंबई नागपूरशी जोडली गेली आहे. विमान ,रेस्वे आणि रस्ते मार्गाची सुविधा असलेलेल्या या शहरात औद्योगिक गुंतवणुकीसाठी प्राधान्यांने गुंतवणूकदार विचार करीत आहे. एकीकडे औद्योगिकदृष्या विकसीत होणारे हे शहर दुसरीकडे त्याच्या विस्तारामुळे दिवसेंदिवस भौगोलिकदृष्या वाढू लागले आहे. त्यामुळे येथील मुलभूत सुविधांवर ताण पडू लागला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अत्याधुनिक सुविधा असलेले आणि पुढील पंचवीस वर्षाचा विस्तार लक्षात घेऊन नवीन नागपूर विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सोमवारी मूर्त रुप प्राप्त झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
नवीन नागपूरसाठी नागपूर महानगर विकास प्राधिकरण, एनबीसीसी आणि हुडको यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सामंजस्य करार करण्यात आला. नवीन नागपूरसाठी एनबीसीसी प्रकल्प सल्लागार म्हणून काम करणार आहे. नागपर लगतच्या हिंगणा तालुक्यातील १७१० एकरमध्ये हे शहर विकसीत केले जाणार आहे. त्यात १४० किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता तयार करण्यात येणार आहे. यामुळे सध्या नागपुरात येणाऱ्या जड वाहनांचा भार कमी होणार असून नवीन बाह्य वळण मार्गावर चार बस आणि ट्रक टर्मिनल तयार करण्यात येणार आहे.
नवीन नागपूर विकसीत करण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी ११ हजार ३०० कोटी रुपये हुडको देणार आहे. यातील ६ हजार ५०० कोटी रुपये नवीन शहर विकसीत करण्यासाठी तर ४८०० कोटी बाह्यवळण (आऊटर रिंगरोड)साठी खर्च करण्यात येणार आहे. या संपूर्ण विकास कामांचे सल्लागार म्हणून एनबीसीसी काम पाहणार आहे.
नागपूरमध्ये मिहान प्रकल्प असून संरक्षण सामुग्री उत्पादन करणारे अनेक उद्योग नागपुरात सुरू झाले आहे. विमानाचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्याही नागपूरमध्ये गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे भविष्यात नागपूर एक मध्य भारतातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून विकसीत केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हुडको,एनबीसीसी आणि नागपूर महानगर विकास प्राधिकरण यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्वाचा मानला जातो.