नागपूर : गुरुवारी साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमीच्या निमित्ताने शहरात पाच हजारांहून अधिक फौजफाटा प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवणार आहे. दिक्षाभूमीवरील भाविकांची गर्दी पाहता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दिक्षाभूमीकडे जाणारे सगळे रस्ते वाहनांसाठी बंद असतील. विजयादशमीच्या निमित्ताने रेशिमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मैदानावर मुख्य पथसंचलन आणि शस्त्रपुजन सोहळा होईल. शहरात ५४ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रमही होत आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
दीक्षाभूमीवर यंदाही लाखो अनुयायांची गर्दी लक्षात घेता परिसरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी तब्बल १०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. दीक्षाभूमीच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र १५०० पोलीस तैनात असतील. यात राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रत्येकी १०० अशा दोन तुकड्या, १००० पुरुष आणि ३०० महिला होमगार्ड, ७५० पोलीस, २८० महिला पोलिस तैनात असतील. यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी पंधराशे पोलिस तैनात राहणार आहेत. त्यात २ पोलिस उपायुक्त, चार साहाय्यक पोलिस आयुक्त, १२० पोलिस निरीक्षक, साहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक असे एकूण १ हजार ९० पोलिस अमंलदार, दोन राज्य राखीव दलाच्या कंपनी, दोन दंगल नियंत्रण पोलिस पथके, ३२५ होमगार्ड तैनात असतील.
वाहतूक मार्गात बदल
दीक्षाभूमीवर दोन ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तनाचा मुख्य सोहळा होत आहे. त्यासाठी पोलिसांनी लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, काचीपुरा, माताकचेरी चौक, यामधील रस्ते असे विविध भागामध्ये ५० सीसीटीव्ही लावले आहेत. संपूर्ण दीक्षाभूमी परिसरही सीसीटीव्हीचा वॉच असेल. यातून परिसरातील प्रत्येक हालचाल टिपली जाईल. या शिवाय संपूर्ण शहरात १५०० होमगार्ड, पाच उपायुक्त १२ सहायक पोलिस आयुक्तांसह ७० पोलिस निरीक्षक, ४० साहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह हवालदार आणि अंमलदारांसह दोन राज्य राखीव दलाचा कंपन्यांचा समावेश याखेरीज शीघ्र कृती दल (क्युआरटी) व दंगल नियंत्रण पोलिस पथक (आरसीपी) सुद्धा या परिसरात तैनात राहणार आहे.
५४ ठिकाणी रावणदहन
विजयादमशी निमित्त शहरात ५४ ठिकाणी रावण दहन कार्यक्रम होईल. यात कस्तुरचंद पार्कवरचा मुख्य सोहळ्यासह वाडी व पारडीत प्रत्येकी चार ठिकाणी रावण दहन होईल. या खेरीज तिरंगा चौक, नंदनवन, चोपडे लॉन, मनिषनगर, मानेवाडा, रेशीमबाग आणि इतर ठिकाणी रावणदहन होणार आहे. सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, ३३ ठिकाणी घट विसर्जनानिमित्तही बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
ड्रॅगन पॅलेस, नागलोकही वॉच मोडवर
दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासोबतच कामठी येथील ड्रॅगन पॅलेस नागलोक येथेही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी लक्षात घेता २२५ पुरुष होमगार्ड, ७५ महिला होमगार्ड, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे १८ अधिकारी, १५० पुरुष हवालदार, २५ महिला तैनात असतील. नागलोक येथील बंदोबस्तासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाचे २ अधिकारी, ९ सहाय्यक पोलिस उपायुक्त, ७४ पुरुष पोलिस आणि १८ महिला पोलीस तैनात असतील.