नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या केसलाघाट परिसरातून जात असाल तर सावधान! गेल्या चार-पाच दिवसांपासून या परिसरातील ‘के मार्क’ नावाची वाघीण कोणतेही वाहन दिसले तरी त्या वाहनांवर हल्ल्याचा प्रयत्न करत आहे. याच हल्ल्यात एकजण जखमी झाल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, बछड्याच्या मृत्युमुळे ही वाघीण आक्रमक झाल्याची चर्चा देखील वन्यजीव अभ्यासकांमध्ये आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील केसलाघाट परिसरातील या वाघिणीला चार बछडे असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी पाहिले आहे. यातील एका बछड्याचा याच केसलाघाट मार्गावर वाहनाच्या अपघातात एका बछड्याच्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. वनखाते यावर काहीही सांगत नसले तरीही रात्री अपघात झाल्यानंतर ताबडतोब या बछड्याला तेथून उचलण्यात आले आणि दुसऱ्यादिवशी सकाळी त्याचे शवविच्छेदन करुन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळेच ही वाघीण आक्रमक झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आता एक दिवसापूर्वी या वाघिणीने एका दुचाकीस्वारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी एका चारचाकी वाहनामुळे या दुचाकीस्वाराचा जीव वाचला. तर एक जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून या वाघिणीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर सामाईक झाला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘माधूरी’ नावाची एक प्रसिद्ध वाघीण होती. तर ‘खली’ नावाचा वाघही तेवढाच प्रसिद्ध. या दोघांचे अपत्य म्हणजेच ‘के मार्क’ वाघीण. ताडोबाच्या केसलाघाट पर्वतरांगाभोवती तीचा अधिवास. ती देखील आई झाली आहे आणि बछड्यांना तीने जन्म दिला आहे. ‘के मार्क’ ही वाघीण अतिशय धाडसी म्हणून ओळखली जाते. तेवढीच ती सुंदर देखील आहे. या वाघिणीने दक्षिण ताडोबाच्या केसलाघाट आणि झरीपेठ जंगलावर आपली हुकूमत स्थापन केली आहे. अतिशय जोखमीच्या अशा वनक्षेत्रात ‘के मार्क’ वाघीण राहते. कारण तिच्या अधिवासातून राष्ट्रीय महामार्ग जातो.
अनेकदा ती हा महामार्ग ओलांडताना दिसून आली आहे. तर हिवाळ्यात ती बरेचदा या राष्ट्रीय महामार्गावरुन बराच लांब अंतरापर्यंत मार्गक्रमण करतानासुद्धा दिसून आली आहे. त्यामुळे जंगलात पर्यटनासाठी जाणारे पर्यटकच नाही तर या महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनाही ती दर्शन देत असते. तिच्या अधिवास क्षेत्रात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील प्रसिद्ध वाघ ‘मोगली’चा लहान मुलगा ‘छोटा मोगली’ आणि निमढेलावर राज्य करणारी ‘झरणी’ ही वाघीणसुद्धा अधूनमधून येऊन जाते. मात्र, ‘के मार्क’ वाघिणीच्या अधिवास क्षेत्रात तिचेच वास्तव्य आहे. यात ती कुणाला लुडबूड करु देत नाही.
