भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अखेर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले. माहविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव केला. विद्यमान खासदारांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, २५ वर्षांनंतर काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा एकदा काबीज केला आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच निवडणूक लढणार, हे जवळजवळ स्पष्ट होते. परंतु, ऐनवेळी त्यांनी नकार देत डॉ. पडोळे यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला काँग्रेसने ‘डमी’ उमेदवार दिल्याचा आरोप झाला. विरोधकांनीही हा मुद्दा सतत चर्चेत आणला. भाजप पुन्हा या जागेवर निवडून येणार, असे बोलले जात होते. परंतु, पटोले यांचा वरचष्मा, त्यांची राजकीय खेळी व आजपर्यंतचा अनुभव यामुळे काँग्रेसने या मतदारसंघात पुन्हा नव्याने प्रवेश केला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे पुनरागमन प्रफुल पटेल यांची डोकेदुखी वाढवणारे आहे. आतापर्यंत पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने येथे मोठा जम बसविला होता. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर काँग्रेसचे मोठे आव्हान असणार आहे.

बंडखोर निष्प्रभ

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक बंडखोरांमुळेही चांगलीच चर्चेत होती. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर वाटेल तसे आरोप करून अपक्ष निवडणूक लढविली. मात्र निकालाअंती त्यांचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच आता त्यांच्या पुढील राजकीय भवितव्यही धोक्यात आले आहे. त्यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघातही मतदारांनी त्यांना नाकारल्याचे त्यांना मिळालेल्या मतांमधून दिसून येते. भाजपने निलंबित केलेल्या संजय कुंभलकर यांना बसपाने उमेदवारी दिल्याने बसपातील निष्ठावंत कमालीचे नाराज झाले होते. यामुळे बसपाची पारंपरिक मतेही कुंभलकर यांना मिळू शकली नाहीत. ही मते काँग्रेसच्या बाजूने वळली. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या मतांमध्ये वाढ झाली.

हेही वाचा >>>यवतमाळ-वाशीमचा गड ठाकरे गटाने राखला; संजय देशमुख ९४ हजार ४७३ मतांनी विजयी

महायुतीच्या सभांचा परिणाम झाला नाही

भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी, अशी असली तरी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांनी सुनील मेंढे यांच्या नावाची शिफारस भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानुसार मेंढे यांना उमेदवारीही मिळाली. त्यानंतर मेंढे यांना निवडून आणण्यासाठी प्रफुल पटेल यांनी संपूर्ण मतदारसंघात सभा घेतल्या. एवढेच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभांनी मतदारसंघ गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत देश विकासाच्या वाटेवर आहे, हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मतदारांवर त्यांचा फारसा परिणाम पडला नाही. दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेचा केली होती. त्यांनी सुरुवातीपासूनच मतदारसंघात तळ ठोकलेला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या साकोली येथे झालेल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. इंडिया आघाडीची सरकार सत्तेत आल्यास तरुण, शेतकरी, मजूर, महिला यांच्यासाठी विविध योजनांचा जाहिरनामा राहुल गांधी यांनी मतदारांना पटवून दिला. याशिवाय काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही मतदारसंघात सभा घेतल्या. अखेरीच मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला पसंती दिली. नाना पटोलेंसाठी हा मोठा विजय असून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा धक्का मानला जात आहे.