नागपूर : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी  विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या १२ उमेदवारांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे चित्र मतांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. वंचितला या १२ ठिकाणी जेवढी मते मिळाली, त्यापेक्षा कमी मतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे  विदर्भातील दिग्गज नेते पराभूत झाले.

दक्षिण नागपुरात काँग्रेसचा विजयाचा घास वंचित बहुजन आघाडीने हिरावला, असे म्हणण्यास वाव आहे. येथे काँग्रेसचे गिरीश पांडव यांना ८० हजार ३२६ मते प्राप्त झाली. भाजपचे मोहन मते यांना ८४ हजार ९४८ मते मिळाली तर वंचितचे रमेश पिसे यांनी पाच हजार ५८३ मते घेतली.

धामणगाव रेल्वे येथे  वंचित चे नीलेश विश्वकर्मा यांनी २३ हजार ७७९ मते घेतली. त्याचा फटका काँग्रेसचे विरेंद्र जगताप यांना बसला. जगताप यांनी ८१ हजार ३१३ मते आणि भाजपचे प्रताप अडसड यांनी ९० हजार ८३२ मते घेतली. कामठी येथे भाजपचे टेकचंद सावरकर यांना १ लाख १८ हजार १८२ मते मिळाली. काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी १ लाख ७ हजार ६६ मते घेतली.  वंचितचे राजेश काकडे यांना १० हजार ६०१ मते मिळाली. चिमूर येथेही  वंचितने काँग्रेसच्या पराभवात वाटा उचलला. काँग्रेसचे सतीश वारजूरकर यांना  ७७ हजार ३९४ मते मिळाली आणि भाजपचे विजयी उमेदवार बंटी भांगडिया यांनी ८७ हजार १७६ घेतली.  वंचितचे अरविंद सांदेकर यांना २४ हजार ४७४ मते प्राप्त झाली. सांदेकर यांची मते आणि वारजूरकर यांच्या मतांची बेरीज केल्यास भांगडिया यांच्या मतांपेक्षा अधिक होते.

यवतमाळ येथे काँग्रेसचे अनिल मंग्रुळकर यांचा निसटता पराभव झाला. भाजपचे मदन येरावार यांना ८० हजार ४२५ आणि मंग्रुळकर यांना ७८ हजार १७२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर यांना ७९३० मते मिळाली.

खामगाव येथे काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील यांनी ७३ हजार ७८९ मते घेतली. भाजपचे आकाश फुंडकर यांना ९० हजार ७५७ मते मिळाली. येथे  वंचितचे शरद वसतकर यांना २५ हजार ९५७ मते प्राप्त झाली. अकोला पश्चिममध्ये काँग्रेसचे साजिद खान मनन खान यांना ७० हजार ६६९ मते मिळाली. भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्या पदारात ७३ हजार २६२ मते पडली. वंचितचे मदन भारगड यांना २० हजार ६८७ मते पडली. मूर्तीजापूर येथे तर  वंचितने राष्ट्रवादीपेक्षा अधिक मते घेतली. येथे राष्ट्रवादीचे रविकुमार राठी यांना ४१ हजार १५५ तर भाजपचे ५९ हजार ५२७ मते मिळाली. वंचितचे प्रतिभा अवचर यांनी ५७ हजार ६१७ मते घेतली. वाशीम येथे सुद्धा  वंचितने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. येथे सिद्धार्थ देवळे यांना ५२ हजार ४६४ आणि काँग्रेसचे रजनी राठोड यांना ३० हजार ७१६ मते मिळाली. भाजपने ६६ हजार १५९ मते घेऊन विजय संपादन केला.

मोघे, पुरके, जगताप, सपकाळ यांना फटका

वंचित बहुजन आघाडीच्या तडाक्याने शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, विरेंद्र जगताप, हर्षवर्धन सपकाळ, सुरेश भोयर, गिरीश पांडव यांच्या पराभव झाला. आर्णीत देखील अशाप्रकारे काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसचे  मोघे यांना ७८ हजार ४४६ आणि भाजपचे डॉ. संदीप धुर्वे यांना ८१५९९ मते मिळाली.  वंचितचे निरंजन मसराम यांनी १२ हजार ३०७ मते घेतली. राळेगावची जागा देखील काँग्रेसने  वंचितमुळे गमावली. काँग्रेसचे वसंत पुरके यांना ८०,९४८ आणि भाजपचे अशोक उईके यांना ९०,८२३ मते प्राप्त झाली.  वंचितचे माधव कोहळे यांना १० हजार ७०५ मते मिळाली. बुलढाणा येथे काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांना वंचित बहुजन आघाडीच्या विजय शिंदे यांच्यापेक्षा कमी मते मिळाली. सपकाळ यांना ३१ हजार, ३१६ आणि विजय शिंदे यांनी ४१ हजार ७१० मते घेतली.